मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या ३३ हजारांपेक्षा अधिक बालकांना प्रवेश घेण्यासाठी एक संधी मिळणार आहे. आरटीई प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या निवड यादीमध्ये १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी आतापर्यंत ७२ हजार २८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

राज्यात एकूण १ लाख १४ हजार ८२६ आरटीई जागांसाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड झाली. या बालकांना प्रवेश घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदतीच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास ६५०० हजारांपेक्षा जास्त बालकांच्या पालकांनी प्रवेश निश्चित केले. मात्र त्यानंतरही निवड यादीतील ३३ हजार ५२७ बालकांचे प्रवेश अद्यापही झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी ८ एप्रिलपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. ही अंतिम संधी आहे. यानंतर मुदतवाढ जाहीर केली जाणार नाही, त्यामुळे अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घ्यावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

मुंबई महानगर प्रदेशात झालेले प्रवेश

मुंबईत ४ हजार ९४१ पैकी १ हजार ६४७ बालकांचे प्रवेश झालेले नाहीत तर ठाण्यात १० हजार ५७८ निवड झाली असतानाही ३ हजार ४४६ विद्यार्थी अजूनही प्रवेशाबाहेर आहेत. रायगडमध्ये ४ हजार ३४५ पैकी १ हजार ३६४ आणि पालघरमध्ये ३ हजार १८३ पैकी ७६७ बालकांनी प्रवेश घेतलेला नाही.पुण्यात १७ हजार ७२८ निवडीतून १२ हजार ५०२ प्रवेश झाले, नागपुरात ६ हजार ९९२ पैकी ४ हजार २४४, तर ठाण्यात १० हजार ५७८ पैकी ७ हजार १३२ आणि मुंबईत ४ हजार ९४१ निवडीतून केवळ ३ हजार २९४ प्रवेश झाले. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने ही प्रक्रिया अपेक्षित यश मिळवू शकली नसल्याचे चित्र आहे. अनेक पालकांकडून कागदपत्रांची पूर्तता वेळेत न होणे, प्रवेशपत्र देण्यात आलेल्या अडचणी, तसेच पडताळणी प्रक्रियेत झालेला विलंब ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.