scorecardresearch

राज्यातील ६१ वाहनांवर ‘आरटीओ’कडून कारवाई; जादा भाडे घेतल्यास ई-मेलद्वारे तक्रार

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा गैरफायदा खासगी प्रवासी बस वाहतुकदार घेत असून होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांकडून दुप्पट, तिप्पट भाडे आकारले जात आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा गैरफायदा खासगी प्रवासी बस वाहतुकदार घेत असून होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांकडून दुप्पट, तिप्पट भाडे आकारले जात आहे. या विरोधात प्रवाशांच्या तक्रारीही येत असून जादा भाडेदर घेणाऱ्या ६१ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. जादा भाडे घेतल्यास ई-मेलद्वारे तक्रार करा, असे आवाहनही परिवहन विभागाने केले आहे.

परिवहन विभागाने राज्यात १६ मार्चपासून जादा भाडेदर घेणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतुकदारांविरोधात कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रवासांर्तगत बस मालकाने प्रवाशाकडून जादा भाडे आकारल्यास परिवहन आयुक्त कार्यालय किंवा नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून  transport.commr-mh@gov.in ई मेल आयडीही देण्यात आला आहे.

विशेष मोहिमेतंर्गत खासगी बस आणि ऑपरेटर यांच्यावर कारवाई करण्यात येत असून १६ मार्चपासून २ हजार २९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ वाहनांवर जादा भाडे आकारणीची कारवाई केल्याचे सांगण्यात आले. तर ६२२ वाहनांवर अन्य नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान ४ लाख ६२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.  विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीची सेवा पूर्णपणे सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी प्रवासी बस चालक दुप्पट-तिप्पट भाडे उकळत आहेत.  त्यामुळे नाईलाजाने प्रवाशांना खासगी बससाठी जादा भाडे द्यावे लागत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rto action against vehicles state complaint by e mail case extra rent ysh

ताज्या बातम्या