मनमानी कारभार करणारे मुंबईतील काळी – पिवळी टॅक्सीचालकाचा गरजू प्रवाशांना वेठीस धरीत असून जवळचे भाडे घेण्यास नकार देण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये ताडदेव आरटीओने उपलब्ध केलेल्या हेल्पलाईनवर अशा चालकांविरोधात ७१५ तक्रारी आल्या आहेत. मोबाइल ॲप टॅक्सीचालकांविरोधातील तक्रारींचाही त्यात समावेश आहे. मात्र त्याची संख्या तुलनेत कमी आहे.
हेही वाचा >>> मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपी अटकेत
दक्षिण मुंबईत १ सप्टेंबर २०२२ पासून काळी – पिवळी टॅक्सी आणि मोबाइल ॲपआधारित टॅक्सीचालकांविरोधात तक्रार करण्यासाठी ताडदेव आरटीओने मोबाइल क्रमांक ९०७६२०१०१० उपलब्ध केला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केल्यानंतर त्याची त्वरित दखल घेण्यात येत असून दोषी आढळणाऱ्या चालकाला दंड किंवा वाहन परवाना, अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात येतो. यासाठी ताडदेव आरटीओने तीन अधिकाऱ्याचे विशेष पथक नेमले आहे. त्या पथकाकडे एक वाहन उपलब्ध करण्यात आले असून संपर्क साधण्यासाठी त्यांना मोबाइल, लॅपटॉप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचण निर्माण झाल्यास त्याबाबत mh01taxicomplaint@gmail.com या ई-मेलवर पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधी फोन करून किंवा व्हॉटसॲप, अथवा साधा संदेश पाठवून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> Anil Parab : “ …तर मी म्हाडावर हक्कभंग दाखल करेन, उच्च न्यायालयातही जाणार” अनिल परबांचा इशारा!
प्रवाशांचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सीचालकांविरुद्ध सप्टेंबरपासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबरपासून जानेवारी २०२३ पर्यंत चालकांविरोधात एकूण ७५९ तक्रारी करण्यात आल्या आहेत. यापैकी ७१५ तक्रारी चालकाने भाड्यास नकार दिल्याबद्दल आहेत. ३५ तक्रारी जादा भाडे घेण्याबाबत, तर नऊ तक्रारी प्रवाशासोबत उद्धट वर्तन केल्याबद्दलच्या आहेत. एकूण ७५९ तक्रारीमध्ये १७० तक्रारीचे आरटीओने त्वरित जागेवरच निराकरण केले आहे. तर ५८९ प्रकरणात चालकांना नोटीस बाजावण्यात आली असून यापैकी २६१ प्रकरणात दंड वसूल करण्यात आला आहे. दोन लाख ४० हजार १०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती ताडदेव आरटीओकडून देण्यात आली. उर्वरित प्रकरणात दंड वसुली करण्यात येत आहे.