scorecardresearch

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग: वाहनांच्या भरधाव वेगाला कारवाईची वेसण; प्रतितास १८० किलोमीटर वेगाने वाहनांची धाव

१ डिसेंबरपासून मुंबई – पुणे जुना मार्ग आणि मुंबई – पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर रस्ते सुरक्षा मोहीम हाती घेण्यात आली आहे

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग: वाहनांच्या भरधाव वेगाला कारवाईची वेसण; प्रतितास १८० किलोमीटर वेगाने वाहनांची धाव

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालविण्याचे प्रकार सुरूच असून या मार्गावर हलक्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटरची वेग मर्यादा निश्चित असतानाही १८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीओने मुंबई-पुणे जुना मार्ग आणि मुंबई – पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईतून वरील बाब समोर आली आहे. आरटीओच्या कारवाईत मुंबई – पुणे महामार्गावरील या दोन्ही मार्गांवर दररोज ३६ ते ३७ वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : नाकावाटे देण्याची ‘इन्कोव्हॅक’ लस फक्त खासगी रुग्णालयातच

परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत १ डिसेंबरपासून मुंबई – पुणे जुना मार्ग आणि मुंबई – पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर रस्ते सुरक्षा मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघात कमी करण्याच्या उदिद्ष्ट्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या आरटीओने कारवाईला सुरुवात केली आहे. १ ते २५ डिसेंबर या काळात मुंबई – पुणे दोन्ही मार्गांवर केलेल्या कारवाईत एकूण तीन हजार ७९० प्रकरणे दाखल झाली आहेत. यापैकी ९१४ प्रकरणे ही वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल आहेत. यापैकी द्रुतगती महामार्गावर ६६० आणि जुन्या मार्गावर २५४ प्रकरणांची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हलक्या वाहनांना घाटात प्रतितास ५० किलोमीटर आणि अन्य ठिकाणी प्रतितास १०० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित केली आहे. तर जुन्या मार्गावर प्रतितास ८० किलोमीटरपर्यंत वेगमर्यादा आहे. यामध्ये पाच टक्के सवलत दिली जाते. त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनचालक प्रतितास १८० किलोमीटर वेगाने वाहन चालवित असल्याचे आरटीओच्या कारवाईदरम्यान निदर्शनास आले आहे. तर याच मार्गावर वाहनचालक प्रतितास १४२ किलोमीटर आणि १६० किलोमीटर वेगाने वाहन चालवित आहेत. या सर्व चालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. अतिवेगाने वाहन चालवल्यास दोन हजार रुपयांपर्यंत दंड आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे जुन्या मार्गावर केलेली एकूण कारवाईची माहिती

वेगमर्यादा ओलांडणे- ९१४ प्रकरणे

मार्गिकांचे उल्लंघन-१ हजार १३ प्रकरणे

सीटबेल्ट न लावणे-१ हजार ३१७ प्रकरणे

अनधिकृतरित्या वाहन उभे करणे-५४६ प्रकरणे

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 22:55 IST

संबंधित बातम्या