विविध विकास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याबाबत ‘अॅम्बॅसेडर हॉटेल’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचा निवास आणि भोजनाचा खर्च ‘युनिसेफ’कडून करण्यात आला होता, असे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी स्पष्ट केले आहे. ‘तारांकित हॉटेलात ग्रामविकासाच्या गप्पा’ हे वृत्त मंगळवार १३ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, ग्रामविकास विभागाने आयोजित केलेल्या या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा खर्च ‘युनिसेफ’कडून भागविण्यात आला. आयोजन खर्चात ग्रामविकास विभागाचा वाटा मर्यादित स्वरूपाचा आहे, असे गिरीराज यांनी म्हटले आहे. कार्यशाळेचे स्थळ मंत्रालयाजवळ घेतल्याने मंत्रालयातील इतर विभागांच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना या कार्यशाळेत सहभाग घेणे शक्य झाले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या इतर आनुषंगिक समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग झाला, असेही गिरीराज यांनी नमूद केले आहे.