मुख्यमंत्र्यांच्या नापसंतीनंतर प्रशासन कामाला लागणार
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ऐकत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासनात खळबळ सुरू झाली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन विविध योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. आठवडय़ातून दोन दिवस ग्रामीण भागात जाऊन थेट जनतेशी संवाद साधावा व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
राज्यातील सत्ताबदलानंतर सरकारची वर्षपूर्ती साजरी करीत असतानाच, वरिष्ठ अधिकारी ऐकत नाहीत, अशी जाहीर कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्य सचिवांनी मंत्रालयातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिवांची बैठक घेतली. सचिवांनी मंत्रालयाच्या बाहेर पडून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही याची पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले.
मुख्य सचिवांकडून सूचना
राज्य सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात; परंतु त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही, त्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळतो की नाही, त्यात काही त्रुटी-अडचणी आहेत का, याचा सातत्याने आढावा घेण्याची आवश्यकता आहे. काही प्रमाणात क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी ती जबाबदारी पार पाडतात; परंतु आता मंत्रालयातील सचिवांनाही कामाला लागण्याचे मुख्य सचिवांनी आदेश दिले आहेत. आठवडय़ातून दोन दिवस सर्वच विभागांच्या सचिवांनी ग्रामीण भागाचा दौरा करून विविध योजनांचा आढावा घ्यावा, जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.