मुंबई : खनिज तेल उद्योगातून इथिलीन, प्रोपीलीन (पेट्रोकेमिकल्स) सारखे उपपदार्थ मिळतात. ज्यातून प्रामुख्याने वेष्ठनासाठीचे (पॅकिंग) प्लास्टिक तयार केले जाते. पण, युद्धामुळे तेल आयातीत मोठी घट झाल्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वेष्ठनासाठीच्या प्लास्टिकचा तुटवडा निर्माण होऊन दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे युद्धाच्या झळा थेट शेतकरी, ग्राहकांसह दूध उद्योगाला बसणार आहेत.
खनिज तेलाच्या आयातीत घट झाल्यामुळे इथिलीन, प्रोपीलीन (पेट्रोकेमिकल्स) सारख्या उपपदार्थांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सध्या वेष्ठनासाठीच्या कच्च्या मालाचे दर दुप्पट झाले आहेत. शिवाय पुरवठाही विस्कळीत झाला आहे. युद्धापूर्वी एक लिटर दुधाच्या वेष्ठनासाठी ८५ ते ९० पैसे खर्च येत होता, आता १.५० पैसे ते १.८० पैशांवर खर्च गेला आहे. गत आठवडाभरापासून दरवाढ झाली आहे. शिवाय दररोज वेष्ठनासाठी लागणाऱ्या प्लास्टिकसह अन्य कच्च्या मालाचे दर वाढत आहेत, त्यामुळे दुध आणि दुग्धजन्य उद्योगात अस्थिरता निर्माण झाली आहे, अशी माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.
वेष्ठनासाठीच्या कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या यापूर्वी एका महिन्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या खरेदीची अगाऊ नोंदणी घेत होते. आता चार – चार दिवसांची अगाऊ नोंदणी करावी लागत आहे. त्यामुळे कच्चा माल लहान वाहनातून आणावा लागत आहे. परिणामी वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध संघांची स्वतःची वेष्ठन प्रक्रिया केंद्रे आहेत. त्यातील काही केंद्रे गॅस आधारीत आहेत. गॅसचा तुटवडा असल्यामुळे वेष्ठन केंद्रे कधीही बंद पडू शकतात, अशी स्थिती निर्माण झाल्याची माहिती ‘पराग मिल्क फूडस’चे (गोवर्धन) प्रीतम शहा यांनी दिली.
देशातून दूध भुकटी आणि बटरची निर्यात प्रामुख्याने आखाती देशांना होते. युद्ध सुरू झाल्यापासून आखाती देशांना होणारी निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे दूध भुकटीच्या दरात घसरण झाली आहे. उन्हाळ्यात दुध उत्पादनात घट होते, अशा काळात दूध दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना प्रति लिटर एक – दोन रुपये जास्तीचे मिळतात. त्यामुळे चारा आणि पाणी टंचाईवर मात करणे सोयीचे होते. पण, यंदा युद्धामुळे दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाही. दूध पावडरचे दर प्रति किलो २७० ते २७५ रुपये आणि गायीच्या दुधापासून तयार केलेल्या बटरचे दर प्रति किलो ५१० ते ५१५ रुपये आणि म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या बटरचे दर ४८० रुपयांवर स्थिर आहेत.
पुण्यात बुधवारी दूध उद्योजकांची बैठक
युद्धामुळे वेष्ठनाचा खर्च वाढून दूध उद्योगावर विपरीत परिणाम होत आहे. वेष्ठनाचा खर्च वाढल्यामुळे आणि वेष्ठनाच्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊन निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटातून कसा मार्ग काढायचा, या बाबत चर्चा करण्याठी बुधवारी, २५ मार्च रोजी पुण्यात मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राज्यातील सहकारी आणि खासगी क्षेत्रातील प्रमुख दूध संघाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रकाश कुतवळ यांनी दिली.
उद्योग नुकसान सहन करेल
वेष्ठनाच्या कच्च्या मालाचे दर दुप्पट झाले आहेत. पुरवठाही विस्कळीत झाला आहे. युद्ध थाबले तरीही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी तीन – चार महिने लागतील. दूध भुकटी, बटरचे दर स्थिर आहेत, त्यामुळे दूध भुकटी उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. परिस्थिती अडचणीची आहे. पण, या अडचणीवर मार्ग काढू. उद्योग म्हणून आम्ही झळ, नुकसान सहन करू. शेतकरी आणि ग्राहकांना कमी झळ बसेल, असा निर्णय घेऊ, अशी माहिती पराग मिल्क फूडसचे (गोवर्धन) प्रीतम शहा यांनी दिली.
