लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रशियन पोलिसांनी आपल्या अनिवासी भारतीय मुलाला जुलै महिन्यात मॉस्कोमधून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले, असा आरोप करणारी याचिका त्या अनिवासी भारतीयाच्या वडिलांनी बुधवारी उच्च न्यायालयात केली आहे. तसेच, त्याच्या सुटकेच्या आदेशाची मागणी केली आहे.
आपल्या मुलाचा रशियात कापडाचा व्यवसाय आहे. तो २००० सालापासून तेथे हा व्यवसाय करत आहे. परंतु, गेल्या ४ जुलै रोजी रशियन पोलिसांनी त्याला मॉस्कोमधून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले व नजरकैदेत ठेवले आहे, असा दावा प्रेमकुमार नवलानी यांनी याचिकेद्वारे केला आहे. तसेच, रशियन पोलिसांकडून आपल्या मुलाचा मिळवावा आणि त्याला भारतात आणण्याचे आदेश भारत सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला द्यावेती, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.
आणखी वाचा-दलालांच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर, परीक्षा देणारे ८९ टक्के उमेदवार पात्र
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर नवलानी यांची ही याचिका बुधवारी सादर करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेची सुनावणी १९ डिसेंबर रोजी ठेवली.
याचिकेनुसार, नवलानी यांचा मुलगा रवी याच्यावर सहा जणांनी हल्ला केला आणि नंतर त्याला मॉस्को येथील पोलिसांत नेले. तेथे त्याला त्याला तीस तास अन्न-पाण्याविना ठेवण्यात आले. त्याला कायदेशीर सल्लागार किंवा अनुवादक देखील उपलब्ध करून देण्यात आला नाही. दोन दिवसांनंतर, त्याला रशियन न्यायालयात हजर करण्यात आले. तेथेही त्याला कायदेशीर सल्लागार किंवा अनुवादक देण्यात आला नाही. त्याला दोन महिने नजरकैदेत ठेवण्यात आले होते. कोठडीत असताना त्याचे शारीरिक शोषण करण्यात आले आणि काही अधिकाऱ्यांनी त्याच्या सुटकेसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोपही नवलानी यांनी केला आहे.