मोदीजी बँकेत १५ लाख कधी जमा करताय?, शिवसेनेचा सवाल

गरीबांच्या खात्यात १५ लाख जमा होण्याच्या नावाने विरोधक सरकारवर टीका करत आहेत.

shivsena
Shivsena: काळा पैसा व हिंदुत्वावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरले आहे. (संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण होत नसल्याने जनता नाराज असून, एखाद्याने आमच्या बँकेत १५ लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा? असा सवाल उपस्थित केला तर त्याला काय उत्तर देणार आहात, असा टोला शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारला हाणला आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधताना मोदी सरकारची तुलना चायपेक्षा किटली गरम अशी केली आहे. मोदी यांची ‘मन की बात’ कडक चायप्रमाणे आहे. देश बदलत आहे, पण आम्हाला फुकट चहा नको. निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत १५ लाख रुपये केव्हा जमा करताय? असे एखाद्याने विचारले तर काय सांगावे? त्यास मारावे, जाळावे की धरावे असा प्रश्न काहींना पडू शकतो. चायपेक्षा किटली गरम म्हणतात ते यालाच!, अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

गरीबांच्या खात्यात १५ लाख जमा होण्याच्या नावाने विरोधक सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे काळापैसा भारतात आणण्यासाठी मोदींनी ‘मन की बात’मध्ये काळापैसा धारकांना दम भरला असला तरी काळापैसा बाहेर आणण्यासाठी आता नेटाने प्रयत्न करायला हवेत. देशात सत्ताबदल झाल्यानंतर अच्छे दिन चालत येतील, असे मोदी यांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने सांगितल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर मतांचा पाऊस पडला व त्यांची बोट सत्तेच्या किनार्‍याला लागली. दोन वर्षांनंतर नक्की किती काळे धन देशात आले व किती देशवासीयांच्या बँक खात्यांत पंधरा लाख जमा झाले? अशी टीका विरोधक करीत आहेत. त्यांची तोंड बंद करायला हवीत, नाहीतर मतदार राजा पुढील वेळेस पदरात निराशा टाकेल, असा सल्ला देखील ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saamna editorial on black money issue slams bjp government

ताज्या बातम्या