मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाच्या संरचनात्मक कामांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेला हा पूल ४८० मीटर लांबीचा असून सुमारे ३६ मीटर, म्हणजेच १२ मजली इमारतीइतका उंच आहे. या पुलामुळे बुलेट ट्रेन मार्गाला साबरमती नदी; तसेच परिसरातील विद्यमान रेल्वे आणि अन्य पायाभूत सुविधांवरून मार्गक्रमण करणे शक्य होणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) द्वारे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमी लांबीचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा पूल साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान असून साबरमती स्थानकापासून सुमारे एक किमी, तर अहमदाबाद स्थानकापासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मुख्य रेल्वे मार्गालगत असून हा मार्ग जमिनीपासून सुमारे १४.८ मीटर उंचीवर आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गाला अहमदाबादमध्ये उड्डाणपूल, विद्यमान रेल्वेमार्ग, पूल आणि मेट्रो मार्गांसह अनेक पायाभूत सुविधा ओलांडाव्या लागतात. आवश्यक उभ्या अंतराची पूर्तता करण्यासाठी साबरमती नदी पुलाच्या पायर्सची उंची तुलनेने अधिक ठेवण्यात आली आहे. या पुलाला आठ गोलाकार पायर्स असून त्यांचा व्यास सहा ते साडेसहा मीटर आहे. त्यापैकी चार पायर्स नदीपात्रात, दोन पायर्स नदीच्या दोन्ही काठांवर आणि दोन पायर्स काठाच्या बाहेरील बाजूस आहेत. पायर्सची ही मांडणी केल्याने नदीच्या पाण्याच्या प्रवाहातील अडथळा कमी करण्यात आला आहे.
बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पुलांमध्ये सुमारे ४० मीटरचे स्पॅन आहेत. मात्र, साबरमती पुलामध्ये ७ मोठे स्पॅन असून त्यापैकी पाच स्पॅन प्रत्येकी ७६ मीटर, तर दोन स्पॅन प्रत्येकी ५० मीटरचे आहेत. मोठ्या स्पॅनमुळे नदीपात्रातील पायर्सची संख्या कमी ठेवणे शक्य झाले आहे. प्रत्येक स्पॅनमध्ये २३ सेगमेंट असून त्यांचे बांधकामस्थळीच ‘इन-सिटू’ पद्धतीने कास्टिंग करण्यात आले. पुलाचे बांधकाम ‘बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर’ पद्धतीने करण्यात आले आहे. या पद्धतीत पायर्सपासून दोन्ही बाजूंनी संतुलित पद्धतीने सेगमेंट उभारून पोस्ट-टेन्शनिंगद्वारे ते जोडले जातात. नदीपात्रात पारंपरिक स्कॅफोल्डिंग उभारण्याची गरज कमी होत असल्याने मोठ्या स्पॅनच्या पुलांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल असून त्यापैकी २१ गुजरातमध्ये आणि चार महाराष्ट्रात आहेत. गुजरातमधील २१ नदी पुलांपैकी १८ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
