मुंबई: ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेतल्याने सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी सचिन अहिर यांचे कौतुक करताना सचिन अहिर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले असल्याने ते योग्यवेळी गोल करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसभापतीपदाचा अर्ज मागे घेतल्याबद्दल विरोधकांचे आभार मानले.  १९९९ साली मी आणि सचिन अहिर सोबत निवडून आलो होतो. अहिर हा शब्दचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे. मला त्यांच्याबाबत अनुभव आहे ते निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहे, असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उपासभापतीपदाच्या खुर्चीवर बसल्यावर प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो. सचिन अहिर ते काम करतील. आतापर्यंत उपसभापती म्हणून ज्यांनी काम केले त्या निलम गोऱ्हे यांचे देखील अभिनंदन करतो. प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या त्या आहेत. मधल्या काळात संघर्षचा काळ होता त्यावेळी देखील त्यांनी चांगले काम केले असे मुख्यमंत्री म्हणाले.

सचिन अहिर यांची कारकीर्द म्हणजे चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता अशी ओळख आहे. कामगारांसाठी त्यांनी काम केले, मिल मजदूर संघाचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. १९९९ साली विधानसभेत आमदार झाले. त्यानंतर 3 वेळा निवडून आले. २००९ साली राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. समर्पक उत्तर देणारा मंत्री म्हणून सचिन भाऊंची ओळख होती. महत्त्वाचा प्रश्न आला की काय अपेक्षा आहे असं देखील म्हणायचे, अशी आठवणही देवेंद्र फडणवीसांनी करुन दिली. सचिन अहिर यांची दहीहंडी विशेष चर्चेत असायची. सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात ते हुशार आहेत.

नेतृत्वाच्या इच्छेनुसार त्यांना निवडणूक लढता आली नाही

२०१९ साली सचिन अहिर यांना निवडणूक लढवायची होती मात्र वरळी मतदार संघातून आमचे मित्र सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी पक्षनेतृत्वाची इच्छा म्हणून निवडणूक लढवली नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला.

कायदेशीर पद्धतीने उपसभापती

सचिन अहिर हे कायदेशीर पद्धतीने झाली आहे. ज्यावेळी सभागृहात ते आले त्यावेळी ते धनुष्यबाण चिन्हावर आले. त्यामुळे बदल असा काही घडलं नाही, असे म्हणत या निवडीवर फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. नीलम गोऱ्हे या उपसभापती झाल्या त्यावेळी विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर दिले, त्यामुळे सचिन अहिर यांच्याबाबत विरोधकांना ही उत्तरे माहित असल्याने ते आक्षेप घेणार नाहीत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

एक सचिन निवृत्त, एक मैदान गाजवायला सज्ज- एकनाथ शिंदे

प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धती असतात. वेगळे गुण असतात. आपल्या टीममध्ये ऑल राउंड विक्रम करणारे खेळाडू असताना कधी कधी वेगळे निर्णय घ्यावे लागतात. नावात सचिन आहे. त्यांना योग्यवेळी निर्णय घेता येतो. एक सचिन नाव मोठं करून निवृत्त झाला आहे. दुसरा एक सचिन आता पॅड घालून मैदानात नवीन इनिंग खेळतोय, मैदान गाजवायला सज्ज आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.