रुग्णालयात असल्याने देशमुख यांना अटक नाही

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केलेली नाही. परंतु त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे, स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सीबीआयने याप्रकरणी अटक केली असून विशेष न्यायालयाने सोमवारी त्यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

देशमुख, वाझे यांच्यासह अन्य आरोपींच्या चौकशीसाठी दोन विशेष न्यायालयांनी गेल्या आठवडय़ात सीबीआयला परवानगी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने सोमवारी वाझे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करून विशेष न्यायालयासमोर कोठडीसाठी हजर केले. आरोपींना चौकशीसाठी दिल्ली येथील मुख्यालयात न्यावे लागणार आहे. तेथे त्यांची वैज्ञानिक चाचणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना कोठडी सुनावण्याची मागणी सीबीआयने विशेष न्यायालयाने केली होती. ही मागणी मान्य करत विशेष न्यायालयाने वाझे आणि अन्य आरोपींना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. 

न्यायालयांशी पत्रव्यवहार

न्यायालयाच्या परवानगीनंतर फेब्रुवारी महिन्यात वाझे आणि अन्य आरोपींची कारागृहात जाऊन सीबीआयने चौकशी केली होती. मात्र त्यावेळी एकाही आरोपीने चौकशीत सहकार्य केले नव्हते, असा दावा करून त्यांची कोठडी देण्याच्या मागणीसाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. परंतु वाझे हे राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयाने सुनावलेल्या, तर देशमुख व अन्य आरोपी हे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने या दोन्ही न्यायालयांना पत्रव्यवहार केला होता. तसेच सगळय़ा आरोपींच्या चौकशीसाठी सीबीआयला कोठडी मंजूर करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.