मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ”अँटिलिया” या निवासस्थानाबाहेर उभ्या केलेल्या वाहनातून डेटोनेटर किंवा फ्यूज नसलेल्या जिलेटिनच्या कांड्या केवळ जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे, बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) हे ”दहशतवादी कृत्य” होते हे सिद्ध होत नाही, असा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
या प्रकरणी मागील पाच वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेल्या वाझे याला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एनआयएच्या या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी, वाझे याच्यातर्फे वरिष्ठ वकील व्ही. एम. थोरात यांनी युक्तिवाद केला. वाझे याला मार्च २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला पाच वर्षांहून अधिक वर्षे लोटली आहेत. अद्यापही तपास सुरू असून ३२० साक्षीदारांची साक्ष होणे शिल्लक आहे. त्यामुळे खटला अद्याही सुरु झालेला नाही, त्यातच हे प्रकरण दहशतवादी कृत्य म्हणता येणार नाही, असे विशेष न्यायालयाने
वाझे याला जामीन मंजूर करताना नमूद केले होते, याप्रकरणातील सहआरोपी असलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला तर याआधी खुनाच्या आरोपांत दोषी ठरवण्यात आले असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. अन्य आरोपीही जामिनावर बाहेर आहेत. असे असताना समानतेच्या आधारावर वाझे हाही जामीन मिळण्यास पात्र असल्याचा युक्तिवाद थोरात यांनी केला. फेब्रुवारी २०२१ रोजी ”अँटिलिया”बाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ गाडी ठेवण्याचा कट रचल्याचा वाझे याच्यावर आरोप आहे. तथापि, स्फोटके मिळवण्याशी आपला काहीही संबंध असल्याचे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही, असा दावा वाझे याच्यातर्फे करण्यात आला. ”अँटिलिया”बाहेर उभ्या केलेल्या वाहनातून डेटोनेटर किंवा फ्यूज नसललेल्या केवळ जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे, युएपीएअंतर्गत ”दहशतवादी कृत्य” सिद्ध होत नसल्याचा दावा वाझे याच्या वतीने युक्तिवाद करताना थोरात यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा आधार
यूएपीएसारख्या कठोर कायद्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही जामिनाबाबत निर्णय घेताना दीर्घकाळ कारावास आणि खटल्यातील विलंब यांचा विचार केला गेला पाहिजे, असे सांगताना त्यासाठी थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ दिला. त्यानुसार, एखाद्या गुन्ह्याचा उलगडा होऊ नये म्हणून केलेली हत्या आपोआप ”दहशतवादी कृत्य” ठरत नसल्याचे न्यायालयाने नमूद केल्याचेही थोरात यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट २०२६ मध्ये वाझे आणि शर्मा यांच्यासह अन्य आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. तथापि, अद्याप खटल्याला सुरूवात झालेली नाही, असेही थोरात यांनी न्यायालयाला सांगितले.
