मुंबई : प्रतिमा सुधारण्यासाठी आणि स्वतःला ‘सुपर कॉप’ म्हणून सिद्ध करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटालिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही गाडी उभी केली होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी वाझे याला मंजूर झालेला जामीन रद्द करण्याची मागणी करताना केला.

अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर उभी केलेली ही गाडी वाझेचा व्यावसायिक मित्र मनसुख हिरेन याची होती. तथापि, हिरेन हा एक ‘कमकुवत दुवा’ ठरू शकतो आणि आपले कारस्थान उघड करू शकतो या भीतीतून वाझे याने त्याचा खून केल्याचा दावाही एनआयएतर्फे करण्यात आला. ‘अँटालिया’बाहेरील स्फोटके आणि हिरेन खून प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने वाझे याला मंजूर केलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी एनआयएने उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. तथापि, बुधवारी प्रकरणाची सुनावणी पूर्ण न होऊ शकल्याने न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्थगिती आदेशही सुनावणी पूर्ण होईपर्यंत कायम ठेवला.

तत्पूर्वी, बनावट चकमक प्रकरणातील कथित सहभागामुळे यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते आणि तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख म्हणून काम करत होता. त्यामुळे, वाझेला आपली प्रतिमा सुधारायची होती आणि म्हणूनच त्याने एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके असलेली कार उभी करण्याचा कट रचला. या प्रकरणाचा तपास आपल्याकडेच सोपवला जाईल, याची खात्री त्याने केली. त्यानंतर, आपणच हे प्रकरण सोडवले आहे असे भासवून ‘सुपर कॉप’ म्हणून वाहवा मिळवण्याचा त्याचा उद्देश होता, असा या कटामागील मुख्य हेतू असल्याचे एनआयएच्या वतीने अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

केवळ अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्याच नाहीतर संपूर्ण समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते, तथापि, ही गाडी हिरेन याची होती. परंतु, तो पकडला गेल्यावर कट उघड होईल या भीतीने वाझे याने त्याचा खून केला, असेही सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठेवली.