Sachin Waze Bail Rejected: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. त्यामुळे, गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात असलेल्या वाझे याला कारागृहातच राहावे लागणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि त्यानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन याचा खून झाल्याप्रकरणी पाच वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेला वाझे याला विशेष सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन वाझे याला जामीन देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने एनआयएच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेतली. तसेच, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर, १६ ऑक्टोबर रोजी याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठाने गुरुवारी एनआयएच्या याचिकेवर निर्णय देताना विशेष सत्र न्यायालयाचा वाझे याला जामीन देण्याचा निर्णय रद्द केला.

एनआयएचा दावा

बनावट चकमक प्रकरणातील कथित सहभागामुळे यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते आणि तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख म्हणून काम करत होता. त्यामुळे, वाझेला आपली प्रतिमा सुधारायची होती आणि म्हणूनच त्याने एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके असलेली कार उभी करण्याचा कट रचला. या प्रकरणाचा तपास आपल्याकडेच सोपवला जाईल, याची खात्री त्याने केली. त्यानंतर, आपणच हे प्रकरण सोडवले आहे असे भासवून ‘सुपर कॉप’ म्हणून वाहवा मिळवण्याचा त्याचा उद्देश होता, असे या कटामागील मुख्य हेतू असल्याचे एनआयएच्या वतीने अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. केवळ अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्याच नाही तर संपूर्ण समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते, तथापि, ही गाडी हिरेन याची होती. परंतु, तो पकडला केल्यावर कट उघड होईल या भीतीने वाझे याने त्याचा खून केला, असा दावाही सिंह यांनी केला होता.

वाझेचा युक्तिवाद

फ्यूजशिवाय असलेल्या जिलेटिनच्या कांड्या जप्त करणे ‘बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत ‘दहशतवादी कृत्य’ सिद्ध होत नाही, असा प्रतिदावा वाझेच्या वतीने वकील व्ही. एम. थोरात यांनी न्यायालयात केला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देण्यात आला. तसेच, वाझे याला मार्च २०२१ मध्ये अटक करण्यात आली. या घटनेला जवळपास पाच वर्षे लोटली आहेत. अद्यापही तपास सुरू असून ३२० साक्षीदारांची साक्ष होणे शिल्लक आहे. त्यामुळे खटला अद्याही सुरू झालेला नाही, त्यातच वाझे याच्याविरोधातील युएपीएअंतर्गत कलमे रद्द करण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर या प्रकरणातील सहआरोपी असलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला खुनाच्या आरोपांत जन्मठेपेची शिक्षा झाली असतानाही त्याला त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अन्य आरोपीही जामीनावर आहेत. शिवाय, यूएपीएसारख्या कठोर कायद्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही जामिनाबाबत निर्णय घेताना दीर्घकाळ कारावास आणि खटल्यातील विलंब यांचा विचार केला गेला पाहिजे, असा दावा करून समानतेच्या आधारावर वाझे हाही जामीन मिळण्यास पात्र असल्याचा युक्तिवाद थोरात यांनी केला होता.