निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात तुरुंगात आहेत. वाझेंवर अलीकडेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना घरी तात्पुरतं नजरकैदेत ठेवण्यात यावं, अशी मागणी वाझेंनी केली आहे. तर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला विरोध केला आहे. वाझेंची नजरकैदेची याचिका मंजूर झाल्यास ते फरार होऊ शकतात, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे.

सुरक्षित, स्वच्छ आणि तणावमुक्त वातावरणात राहून लवकर बरे होण्यासाठी वाझेंनी विशेष न्यायालयाकडे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती नजरकैद देण्याची परवानगी मागितली होती. तसेच नजरकैदेत असताना सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत त्यांच्या घरी त्यांच्या वकिलाशी वैयक्तिक सल्लामसलत करण्याची परवानगीही मागितली होती. दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय, की वाझेंना तळोजा कारागृहात परत पाठवण्यात येऊ नये. कारण तिथे त्यांना पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मिळणार नाही आणि अधिक संसर्ग होऊ शकतो.

एनआयएने वाझेंना नजरकैदेस मंजुरी देण्यास विरोध केला आहे आणि ते कायद्याच्या आणि न्यायाच्या विरोधात असल्याचं म्हटलंय. तसेच तळोजा मध्यवर्ती कारागृहाशी संलग्न मुंबईतील रुग्णालये वाझेंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व सक्षम सुविधांसह पूर्णपणे सक्षम आहेत. तसेच वाझेंचा अर्ज गृहितकांवर आणि अनुमानांवर आधारित होता. त्यांनी खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार, याच्या अचूक तारखेबद्दल याचिकेत कोणताच उल्लेख केलेला नाही, असंही म्हटलंय.

दरम्यान, वाझे यांचे वकील रौनक नाईक आणि आरती कालेकर यांनी न्यायालयाला सांगितले की शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. सोमवारी त्यांचे टाके काढण्यात आले असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. विशेष न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी वाझेंच्या वैद्यकीय अहवालाची चौकशी केली आहे. त्यामध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीचा समावेश आहे.