मुंबई : सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या निधीपैकी एक रुपयाही मंदिरावर खर्च केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर यांनी दिले. हा खर्च वाहतूक व्यवस्थापन, परिसर सुशोभीकरण व भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिद्धिविनायक मंदिर पुनर्विकास प्रकल्पासाठी महापालिकेचा निधी वापरण्यात येणार आहे. सिद्धिविनायक परिसराच्या विकासासाठी पालिकेचा निधी वापरण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला असून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सदा सरवणकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. तसेच, ५०० कोटी रुपयांपैकी केवळ १०० ते १५० कोटी रुपयांत सर्व कामे होतील. त्या कामांच्या निविदा काढणे, कार्यादेश देणे आदी बाबी महापालिकेमार्फतच केल्या जातील, असे सरवणकर यांनी सांगितले.
सुशोभीकरणासाठी दिलेल्या निधीतून कोणीही टक्केवारी घेणार नाही. पूर्वीच्या अध्यक्षांनी न्यासाच्या निधीतून गाड्या घेतल्या. आताच्या विश्वस्तांनी स्वतःच्या कोणत्याही कामासाठी न्यासाचे पैसे वापरलेले नाहीत. ज्यांचे आयुष्य टक्केवारी घेण्यात गेले, त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा टोला त्यांनी शिवसेनेला (ठाकरे) लगावला. तसेच, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा निधी विशिष्ट उद्दिष्टांसाठीच वापरला जातो. त्याला नियमावली असते. त्यामुळे परिसर सुशोभीकरणासाठी शासनाकडे स्वतंत्र निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने देखील ती मागणी पूर्ण केली. यापूर्वी कोणालाही शासनाकडून निधी आणणे जमले नव्हते, असे ते म्हणाले.
मंदिर उत्पन्नात वाढ
दरम्यान, आताचे विश्वस्त अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असून त्यांनी कामकाजातील विविध त्रुटी दूर केल्या आहेत. परिणामी, मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पूर्वी आठवड्याला ४० ते ४५ लाख रुपये प्राप्त होत होते. मात्र आता उत्पन्नाचा आकडा ९४ -९५ लाखांवर गेला आहे, असे सरवणकर यांनी सांगितले. भविष्यातही उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू, असेही त्यांनी नमूद केले.
मंदिरालगतची एक इमारत न्यासाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर ती इमारत न्यासाकडे येईल. त्यात देखील भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती देखील सरवणकर यांनी दिली. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात अत्यावश्यक कामांवरच भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
