मुंबई : अपेक्षेप्रमाणे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या ३ जानेवारीला सेवानिवृत्त होत असून त्यानंतर दाते पदभार स्वीकारणार असून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल असेल. राज्याच्या गृह विभागाने आज याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

दाते यांनी मुंबई पोलिस दलात गुन्हे शाखा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते. तेथे असतानाच त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली.

अल्पावधीतच ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख बनले. दिल्लीत झालेल्या बॅाम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु होता. याशिवाय मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त, छत्तीसगढ येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे पदही त्यांनी भूषविले. त्याआधी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे विभागात ते अधीक्षक होते.

तेथेच त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली. त्याच काळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यात ते जखमी झाले होते.

त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘फोर्सवन’ची जबाबदारी त्यांनी स्वत:हून मागून घेतली. फोर्सवनचे ते पहिले प्रमुख होते. मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.