मुंबई : ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’चे (एनआयए) विद्यमान महासंचालक सदानंद दाते यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांना राज्य शासनाने दिलेला वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे.

नव्या महासंचालकांची नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला यादी पाठविली असून त्यात सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून दाते यांचा नावाचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून तीन नावांची शिफारस केली जाईल. त्यानंतर राज्य शासनाकडून दाते यांची नियुक्ती होईल.

१९९० च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्रात सध्या प्रतिनियुक्तीवर आहेत. दाते हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत.

सेवाज्येष्ठतेनुसार दाते हे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाला सात अधिकाऱ्यांची नावे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये दाते यांच्यासह महासंचालक (विधी आणि तांत्रिक) संजय वर्मा, गृहरक्षक दलाचे समादेशक रितेश कुमार, लाचलुचपत प्रतिबंधक विेभागाचे महासंचालक संजीवकुमार सिंघल, महाराष्ट्र गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालक अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे महासंचालक संजीव कुमार आणि रेल्वेचे महासंचालक प्रशांत बुरडे यांचा समावेश आहे. या यादीत इंडो-तिबेट बॅार्डर पोलीसचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांना डावलण्यात आले आहे.

यापैकी तीन नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून राज्य शासनाला पाठविली जातात. त्यापैकी एका नावावर राज्य शासनाला शिक्कामोर्तब करता येते. त्यामुळे राज्य शासनाकडून दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रात ते प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्याची विनंती राज्य शासनाने केल्याचे कळते. दाते हे डिसेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार असले तरी त्यांची नियुक्ती झाली तर त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळू शकेल.

दाते यांनी मुंबई पोलिस दलात गुन्हे शाखा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते. तेथे असतानाच त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली. अल्पावधीतच ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख बनले. दिल्लीत झालेल्या बॅाम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

याशिवाय मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त, छत्तीसगढ येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे पदही त्यांनी भूषविले. त्याआधी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे विभागात ते अधीक्षक होते. तेथेच त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली.

त्याच काळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘फोर्सवन’ची जबाबदारी त्यांनी स्वत:हून मागून घेतली. फोर्सवनचे ते पहिले प्रमुख होते. मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.