scorecardresearch

सदिच्छा हिचा झटापटीत मृत्यू ; आरोपीचा चौकशीत दावा

पालघर येथील रहिवासी असलेली सदिच्छा ही  जे. जे. ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती.

सदिच्छा हिचा झटापटीत मृत्यू ; आरोपीचा चौकशीत दावा
सदिच्छा साने

मुंबई : जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा सानेच्या हत्येचा कट रचला नव्हता. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे जीवरक्षक मिथू सिंह याने पोलीस चौकशीत सांगितले. या दाव्याची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान, सदिच्छाचा मृतदेह शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नौदलाच्या मदतीने शुक्रवारी समुद्रात  मोहीम राबवली. 

पालघर येथील रहिवासी असलेली सदिच्छा ही  जे. जे. ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नाही. मिथू सिंह आणि सदिच्छा  यांच्यात अचानक वाद झाला. सदिच्छाने माझ्या वागण्याबाबत आक्षेप घेत भांडण केले. त्यावेळी तिला मागे ढकलले असता तिचे डोके दगडाला आदळले. त्यामुळे झटापटीत तिचा मृत्यू झाला. तिला ठार मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा दावा मिथू याने चौकशीत केला. सदिच्छाचा मृतदेह ‘लाइफ जॅकेट’वर ठेऊन पाण्यात नेला, असेही त्याने सांगितले.

मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी नौदलाच्या मदतीने शुक्रवारी समुद्रात शोधमोहीम राबवली.

प्रकरण काय?

सदिच्छा साने हिचा शोध कुठेच लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ती बेपत्ता होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते.  तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे ठिकाण वांद्रे बॅण्ड स्टॅन्ड  येथे होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथू सिंगने पाहिले होते. अखेर वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिंह व त्याच्या साथीदाराला अटक केली. याप्रकरणी चौकशीत त्याने सदिच्छा हिची हत्या केल्याचे मान्य केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 03:09 IST

संबंधित बातम्या