मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील व देशातील विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने करण्यात येत असताना आता जगभरातून आंबेडकरी आणि बौद्ध संघटनाही साहिलच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील ‘आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’सह विविध संस्थांनी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात साहिलच्या कुटुंबीयांची तसेच अनुसूचित जाती समाजाची जाहीर माफी मागावी, साहिलच्या वर्तनाबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेतील कोणत्याही अधिकाऱ्याने या प्रकरणावर भाष्य करू नये, अशी मागणी केली आहे.
साहिलच्या मृत्यूनंतर तातडीने आयआयटी मुंबईने त्याने परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर करून प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर टाकल्याचे जाहीर केले. संस्थेच्या या वक्तव्याचा संघटनांकडून निषेध करण्यात आला. तसेच साहिल प्रकरणासाठी आयआयटी मुंबईने स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीवरही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. समितीच्या अध्यक्षपदी संस्थेबाहेरील निवृत्त न्यायाधीश किंवा प्रतिष्ठित व्यक्तीची नियुक्ती करावी, समितीत बाहेरील सदस्यांचे बहुमत असावे, तसेच अनुसूचित जाती-जमाती समाजातील किमान दोन वरिष्ठ सदस्य आणि दोन विद्यार्थी सदस्य असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. साहिलच्या कुटुंबीयांच्या वकिलांना पुरावे सादर करण्याची आणि साक्षीदारांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी, तसेच १८ सप्टेंबरच्या घटनाक्रमाचा मिनिटागणिक अहवाल दोन आठवड्यांत प्रसिद्ध करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
सीसीटीव्ही चित्रण प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करा
परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही चित्रण सार्वजनिक झाल्याबाबतही पत्रात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. परीक्षा केंद्र, बाहेरील मार्गिका, अधिष्ठाता कार्यालय आणि वसतिगृहातील सर्व सीसीटीव्ही चित्रण सुरक्षित ठेवून ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे द्यावे, आयआयटी-मुंबईच्या नियंत्रणातील चित्रण समाजमाध्यमांवर कसे पोहोचले, याची माहिती संस्थेने सार्वजनिक करावी आणि ते प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा
अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना भेदभाव किंवा लक्ष्य केल्याच्या तक्रारी करण्यासाठी सध्याच्या अनुसूचित जाती-जमाती कक्षापासून स्वतंत्र आणि गोपनीय व्यवस्था उभारावी, पोलीस, आयोग किंवा चौकशी समितीसमोर जबाब देणाऱ्या विद्यार्थी, कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही शैक्षणिक, वसतिगृह किंवा रोजगारविषयक कारवाई होणार नाही, याची लेखी हमी द्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
१५ दिवसांत लेखी उत्तराची मागणी
आयआयटी मुंबईकडे पाठविण्यात आलेल्या या पत्रावर आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, आंबेडकराइट बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ टेक्सास, आंबेडकराइट बुद्धिस्ट कम्युनिटी ऑफ कॅनडा, आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, आंबेडकर इंटरनॅशनल मिशनसह अनेक संस्थांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आयआयटी मुंबईने प्रत्येक मागणीवर १५ दिवसांत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
