आयआयटी मुंबईत शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने मागच्या महिन्यात आत्महत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. साहिलला जातीवरून हिणवलं जात होतं तो ताण सहन न झाल्याने त्याने स्वतःला संपवलं असा आरोप त्याच्या आई वडिलांनी केला. प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला आणि आयआयटी बॉम्बे यांच्यावरही साहिलच्या वडिलांनी गंभीर आरोप केले होते. दरम्यान आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. साहिलने परीक्षेत कॉपी केली होती आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करत दुसरी संधी द्या असं म्हटलं होतं हे पोलिसांनी म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाचा तपास केला जातो आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात ४० हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात आयआयटीचे संचालक शिरीष केदारे यांचाही समावेश आहे. तसंच प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. १८ सप्टेंबरला साहिल वाकोडेचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला होता. त्याने गळफास घेऊ आत्महत्या केल्याची बातमी यानंतर समोर आलली होती. परीक्षेच्या दरम्यान साहिलने मोबाइल फोनवर चॅटजीपीटीमधून उत्तरं शोधली होती आणि त्याला शिक्षकांनी कॉपी करताना पकडलं होतं ही माहितीही समोर आली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयआयटी बॉम्बे या ठिकाणी जी परीक्षा घेण्यात आली तिथे एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला. याबाबत संस्थेचा नियम असा आहे की जो विद्यार्थी कॉपी करताना आढळला आहे त्याने लेखी दिलगिरी लिहून द्यायची असते. परीक्षा घेणाऱ्या पर्यवेक्षकाडून जेव्हा कॉपीची तक्रार दिली जाईल आणि पुरावे सादर केले जातील त्यानंतर लगेच म्हणजेच दोन दिवसांच्या आत हे लेखी देणं अपेक्षित असतं. साहिलला त्या दिवशी कॉपी करताना पकडण्यात आलं होतं. त्याने ही गोष्ट त्याच्या एका मैत्रिणीला सांगितली होती. तसंच त्याने दिलगिरी व्यक्त केली होती आणि मला आणखी एक संधी द्या असंही संस्थेला सांगितलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान पोलिसांनी अशीही माहिती दिली आहे की सूर्यनारायण डुल्ला यांचा जो जबाब नोंदवण्यात आला त्यात त्यांना साहिलच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. मात्र डुल्ला यांनी मी कुणालाही जातीवरून कधीही हिणवलं नाही असं उत्तर दिलं आहे. तसंच साहिल किंवा इतर कुठल्याही विद्यार्थ्याचा मानसिक छळ केलेला नाही असंही प्रो. डुल्ला यांनी सांगितल्याचं पोलीस म्हणाले. पोलिसांनी या सगळ्यासह आयआयटीमधील १० सदस्यीय समितीलाही या घटनेबाबत प्रश्न विचारले आहेत. समितीने हे देखील सांगितलं की ऑगस्ट महिन्यात आम्ही आमचाच एक नियम मागे घेतला होता ज्या नियमानुसार कुणालाही कॉपी करताना किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरताना पकडलं तर त्याला त्या विषयात नापास करणं आणि एका सेमीस्टरसाठी निलंबित करणं असा तो नियम होता जो ऑगस्ट महिन्यात मागे घेण्यात आला.
