मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणातील बांगलादेशी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने शुक्रवारी सत्र न्यायालयात एक अर्ज दाखल केला व गुन्हा कबूल करण्यास तयार असल्याचे न्यायालयासा सांगितले. तसेच, त्याने न्यायालयाकडे दयेची याचनाही केली.

घटनेनंतर दोन दिवसांनी अटक करण्यात आलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शरीफुल याने गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा अर्ज न्यायालयात दाखल केला असून त्यात न्यायालयाकडे दयेची विनंती केली आहे. न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन सरकारी पक्षाला त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, प्रकरणाची सुनावणी ११ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

या महिन्याच्या सुरुवातीला, अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी शरीफुल याच्यावर आरोप निश्चित केले होते, त्यामुळे, त्याच्यावरील खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. शरीफुल याच्यावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राचा वापर करणे, गंभीर दुखापत करणे आणि घरात अनधिकृत प्रवेश करणे यासारख्या भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांतर्गत, तसेच परदेशी नागरिक कायदा आणि पारपत्र (भारतात प्रवेश करणे) अधिनियमांतील संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.