मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याच्या पोलीस कोठडीत वांद्रे न्यायालयाने वाढ केली आहे. वांद्रे न्यायालयाने आरोपीला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सैफवर हल्ला करणार आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगलादेशी घुसखोर असून त्याने मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि त्याला एक सिम कार्डही उपलब्ध केले. त्याच दलालाने त्याला कोलकात्याला जाण्याऱ्या बसमध्ये बसवून दिले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत जाण्यासाठी रेल्वे पकडली. मुंबईत त्याने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे याच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला काढून टाकण्यात आले.

नोकरी गमावल्यानंतर शरीफुलने चोऱ्या करण्यास सुरूवात केली. शरीफ ३१ डिसेंबरपासून खार आणि वांद्रेसारख्या उच्चभ्रू परिसरात फिरून आपले लक्ष्य शोधत होता. घरफोडी करण्यासाठी त्याने स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा आणि हॅक्सॉ ब्लेड घेतले. ठाण्याच्या रेस्टॉरंटमधून चोरलेला चाकूही शरिफुल जवळ बाळगत होता, अशी माहिती चौकशीत मिळाली. त्याने अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता.

Story img Loader