मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणातील बांगलादेशी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने पुन्हा एकदा गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा आणि दयेची याचना करणारा अर्ज सत्र न्यायालयात केला आहे.
घटनेनंतर दोन दिवसांनी अटक करण्यात आलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शरीफुल याने गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता आणि न्यायालयाकडे दयेची विनंती केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी त्याच्या अर्जावर निर्णय देताना तो फेटाळला होता. त्यानंतरही शरीफुल याने पुन्हा एकदा सत्र न्यायालयात अर्ज करून गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवली आहे. न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन कारागृह प्रशासनाला बांगलादेश दूतावासाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले.
गेल्या या महिन्याच्या सुरुवातीला, सत्र न्यायालयाने शरीफुल याच्यावर आरोप निश्चित केले होते, त्यामुळे, त्याच्यावरील खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तथापि, शरीफुल याने पुन्हा एकदा गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा अर्ज न्यायालयात केला आहे. दरम्यान, शरीफुल याच्यावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राचा वापर करणे, गंभीर दुखापत करणे आणि घरात अनधिकृत प्रवेश करणे यासारख्या भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांतर्गत, तसेच परदेशी नागरिक कायदा आणि पारपत्र (भारतात प्रवेश करणे) अधिनियमांतील संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
