Saif Attacker Tag : १६ जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात छत्तीसगढ येथील दुर्गमधल्या एका माणसाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर या माणसाचं आयुष्यच बरबाद झालं असंच म्हणता येईल. कारण आता त्याची नोकरी गेली, तसंच त्याचं लग्न ठरलं होतं तेदेखील मोडलं. शिवाय त्याच्या कुटुंबावर बदनामीचा शिक्काही बसला. ३१ वर्षांच्या आकाश कनौजिया नावाच्या ड्रायव्हरच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे. मुंबई पोलिसांना १८ जानेवारीला मिळालेल्या माहितीनंतर त्याला दुर्ग स्टेशनवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ जानेवारीला पकडला गेला सैफचा हल्लेखोर

१९ जानेवारीला मुंबईजवळ असलेल्या ठाण्यातून बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दासला पोलिसांनी सैफवर हल्ला केल्या प्रकरणी अटक केली. सैफ अली खानच्या सतगुरु शरण या इमारतीत शरीफुल शिरला होता. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला आणि त्या दरम्यान सैफसह त्याची झटापट झाली. त्या वेळी त्याने सैफवर चाकूचे सहा वार केले. सैफला यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डिस्चार्जही मिळाला. मात्र या घटनेने आकाश कनौजियाचं आयुष्यच बदलून गेलं.

आकाश कनौजियाने काय म्हटलं आहे?

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार आकाश कनौजिया म्हणाला की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझं आयुष्य बरबाद झालं. त्यांनी हेदेखील पाहिलं नाही की मला मिशा आहेत आणि सैफवर ज्याने हल्ला केला त्या हल्लेखोराच्या मिशा नाहीत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मी नाही हे त्यांनी नीट पाहिलं नाही. मीडियाने माझे सैफवर हल्ला करणारा संशयित म्हणून फोटो काढले आणि माझ्या कुटुंबाला त्यामुळे धक्का बसला. माझे आई वडील रडू लागले. आता माझी नोकरीही गेली आणि माझं ठरलेलं लग्नही मोडलं.

आकाश कनौजियाचं लग्न मोडलं

आकाश कनौजियाने हे देखील सांगितलं की सैफवर हल्ला झाला तेव्हा मला मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की तू कुठे आहेस? मी सांगितलं मी माझ्या घरी आहे. त्यानंतर दुर्गमधून त्यांनी मला ताब्यात घेतलं. त्यावेळी मला रायपूरला नेण्यात आलं. रायपूरहून मुंबईला आणण्यात आलं. मुंबई पोलिसांनी मला मारहाण केली. माझी सुटका झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या घरी गेलो तेव्हा माझ्या आयुष्यात खळबळ माजली होती. कारण मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. तसंच माझ्या आजीने मला सांगितलं की माझं लग्नही मोडलं आहे. माझ्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबाने घरी येऊन लग्नाची बोलणी थांबवण्यास सांगितलं आहे. एका घटनेने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेल्याचं आकाशने हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif attacker tag costs colaba resident his job marriage what happened with akash kanojia scj