मुंबई : कामाच्या अतिरिक्त तासांबाबत आणि छळाबाबत एका पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या (डीएनबी) प्रशिक्षणार्थिने केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचा दावा करून सैफी रुग्णालयाने या प्रशिक्षणार्थीविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिच्याविरुद्ध १२५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. गैरवर्तन आणि वैद्यकीय कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून रुग्णालयाने या प्रशिक्षणार्थीला निलंबित केले होते. त्यानंतर, तिने गेल्या आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या प्रशिक्षणार्थीकडून १२५ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी करतानाच रुग्णालयाविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून तिला थांबवण्याची, तिने आधीच प्रसिद्ध केलेला मजकूर हटवण्याची आणि तिने बिनशर्त माफी मागावी, अशा मागण्या रुग्णालयाने याचिकेद्वारे केल्या आहेत. रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करणारा आणि निलंबनाचा आदेश काढल्यानंतर या प्रशिक्षणार्थीने मोठ्या प्रमाणात औषधे घेतली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक उपचार देण्यात आले असले तरी, दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या नातेवाईकांनी वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध तिला रुग्णालयातून घरी नेले, असेही याचिकेत म्हटले आहे.
रुग्णालय प्रशासनाने प्रशिक्षणार्थीवर विनापरवानगी गैरहजेरी, कर्तव्यात कसूर आणि आज्ञापालनास नकार दिल्याचा आरोप केला आहे, तर प्रशिक्षणार्थीने तिला कामाचे अतिरिक्त तास दिले जात होते आणि प्राध्यापक व वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून मानसिक छळ सहन करावा लागत होता, असा दावा केला आहे. रुग्णालयाने मानहानीच्या दाव्यात, ही प्रशिक्षणार्थी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामाच्या वेळेत गैरहजर होती याबाबत रुग्णालय ट्रस्टने एप्रिलपासूनच्या (प्रवेशानंतर अवघ्या काही महिन्यांतच) अनेक घटनांचा तपशील दिला आहे. त्यात, तिच्यावर सोपवलेली वैद्यकीय कामे (क्लिनिकल टास्क) न करणे आणि रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे यासारख्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. यामध्ये शस्त्रक्रियेनंतरच्या देखरेखीसाठी लावलेल्या ”ड्रेन ट्यूब”मधून बाहेर पडणाऱ्या द्रवाचे चुकीचे आकडे नोंदवणे, ”रॅडिकल नेक डिसेक्शन” शस्त्रक्रिया झालेल्या दुसऱ्या रुग्णाच्या ”फ्लॅप”ची तपासणी न करणे आणि शस्त्रक्रियेनंतरच्या दोन रुग्णांकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
याच कारणास्तव ऑगस्टमध्ये, रुग्णालयाने या प्रशिक्षणार्थीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आणि तिला ”कारणे दाखवा” नोटीस बजावली होती. त्यात कथित गंभीर गैरवर्तणुकीच्या १३ घटनांची यादी देण्यात आली होती. तिला एका आठवड्याच्या आत या पत्राला उत्तर देण्यास सांगण्यात आले आणि सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता, असेही रुग्णालयात मानहानीशी संबंधित याचिकेत म्हटले आहे.
दुसरीकडे, या प्रशिक्षणार्थीने समाजमाध्यावर काही पोस्ट केल्या होत्या. त्यात, बेकायदेशीर कामाच्या तासांचा सामना करावा लागणे, तिला शस्त्रक्रिया विभागातून काढून केवळ निवासी म्हणून नियुक्त करणे आणि वरिष्ठ तसेच रुग्णालय व्यवस्थापनाकडून होणारा मानसिक छळ याबाबत तक्रारी केल्या होत्या. तिने एनबीएएमएस आणि आणि रुग्णालयाच्या तक्रार निवारण समितीसह इतर प्राधिकरणांकडेही तक्रार दाखल केल्याचे म्हटले होते.
