भारतीय नौदलाच्या आयएनएस विराट या युद्धनौकेवर रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत एका नौसैनिकाचा मृत्यू झाला असून अन्य अत्यवस्थ झाले आहेत. आयएनएस विराट नेहमीप्रमाणे गोव्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. यावेळी जहाजावरच्या बॉयलर रूममध्ये वाफेच्या गळती झाल्यामुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र, यादरम्यान धुराने गुदमरल्यामुळे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले. यापैकी अभियांत्रिकी विभागात तंत्रज्ञ असलेल्या आशुसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, वाफेची गळती होऊन निर्माण झालेल्या उष्णतेमुळे ही आग लागली. या दुर्घटनेची अधिकची चौकशी सुरू असल्याची माहिती नौदलातील सूत्रांनी दिली.
भारतीय नौदलाच्या सेवेत एकूण २९ वर्षे राहिलेली आणि जगातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५७ वर्षे कार्यरत राहिलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ येत्या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे.