मुंबई : मुंबईत यंदा उंच गणेशमूर्तींचा मुद्दा चर्चेत असताना साकीनाका येथील गणेशोत्सव मंडळाने पीओपीची ४० फूट उंच गणेशमूर्ती साकारली आहे. ‘जय मल्हार’च्या स्वरुपातील ही उंच मूर्ती सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहे. या मंडळाची विसर्जन मिरवणूक कशी असेल, विसर्जन कसे करणार याबाबत गणेशभक्तांमध्ये उत्सुकता आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मंडळाने विशेष तयारी केली आहे.
गेल्या महिन्यात भुलेश्वर येथे आगमन मिरवणुकीदरम्यान गणपतीची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना कुर्ला येथेही एक मूर्ती कोसळून दोन जण जखमी झाले. त्यामुळे उंच मूर्तींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उंच मूर्तींचे आकर्षण वाढत असतानाच सर्वात उंच मूर्ती कोणत्या मंडळाची आहे याबाबतही उत्सुकता आहे. साकीनाकाचा महाराजा या मंडळाने यंदा ४० फुटांची उंच मूर्ती साकारली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, झाडांच्या फांद्या आणि केबल्स यामुळे उंच व वजनदार मूर्तींच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळाने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे.
दरम्यान, उंच मूर्तींच्या विसर्जनावेळी मार्गातील वीजवाहिन्या, झाडे, पूल आणि इतर अडथळे प्रशासनासाठी आव्हान ठरतात. मोठ्या मूर्तींमुळे विसर्जनस्थळी गर्दीही वाढते. त्यामुळे पालिका, अग्निशमन दल, पोलीस आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वय ठेवून विसर्जनाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
मूर्तीच्या निर्मितीसाठी १६ लाखांचा खर्च
या मूर्तीबाबत मंडळाचे अध्यक्ष जोगेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, यंदाची गणेशमूर्ती ४० फूट उंच आहे. सुमारे दोन टन वजनाच्या या मूर्तीचे पवई तलावात क्रेनच्या साहाय्याने विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मूर्ती नेणाऱ्या ट्रॉलीखाली खड्डे आल्यास थर्माकोलचा वापर करून खड्ड्यांमुळे बसणारे धक्के कमी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मार्गातील झाडांच्या फांद्या आणि केबल्स हटविण्यासाठी पालिका प्रशासनाला विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या मूर्तीच्या निर्मितीसाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च झाले असून सुरक्षिततेची सर्व खातरजमा केल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे.
मुर्तीच्या स्थिरतेसाठी नट बोल्ट
मूर्तीच्या स्थिरतेबाबत विशेष काळजी घेण्यात आल्याचे सांगताना गायकवाड म्हणाले की, मूर्ती आणि ट्रॉलीची जोडणीही विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. नट-बोल्टच्या साहाय्याने मूर्ती ट्रॉलीला घट्ट जोडण्यात आली असून, ट्रॉलीच्या खालच्या भागात सुमारे एक टन वाळू ठेवण्यात आली आहे. दोन टन वजनाच्या मूर्तीचा समतोल कायम राहावा आणि वाहतुकीदरम्यान तो बिघडू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मंडळात माथाडी कामगारांचे स्वतंत्र पथक असून मूर्तीची हाताळणी आणि विसर्जनाची तांत्रिक प्रक्रिया याबाबत त्यांना अनुभव आहे. त्यामुळे पवई तलावात क्रेनच्या मदतीने मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
