मुंबई : साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या असलम शेख (५५) यांच्या कुटुंबियांना महापालिका प्रशासनाने अखेर मंगळवारी सायंकाळी १० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली. महापालिकेने ‘आरटीजीएस’मार्फत (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) संबंधितांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली. अर्थसाह्यात होणाऱ्या दिरंगाईबाबत ‘लोकसत्ता’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिकेतर्फे त्याच दिवशी सायंकाळी संबंधितांना रक्कम वितरित करण्यात आली.

साकीनाका येथील खैरानी मार्गावर २ जुलै रोजी महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत मॅनहोलवर ‘संरक्षक जाळ” बसविण्याची कार्यवाही सुरू होती. त्यामुळे मॅनहोलवरील झाकण उघडण्यात आले होते. मात्र, मॅनहोलशेजारी रस्तारोधक किंवा कोणतेही सुचनाफलक लावण्यात आले नव्हते. रस्त्यावरून चालत असताना असलम शेख (५५) यांना उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने ते मॅनहोलमध्ये पडले. त्या दुर्घटनेत शेख यांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या दुर्घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.

मात्र, महिना उलटूनही कुटुंबियांना अर्थसाह्य मिळाले नव्हते. याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी अर्थसहाय्यातील विलंबाबाबत वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनाने त्याच दिवशी सायंकाळी संबंधित कुटुंबातील सदस्याच्या बँक खात्यात ‘आरटीजीएस’मार्फत १० लाखांची रक्कम वितरित केली. महापालिकेच्या या मदतीनंतर कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.