मुंबई : साकीनाका येथे मनुष्य प्रवेशिकेमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

चेंबूरमध्ये झाड पडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे बुधवारी निलंबन केल्यानंतर लगेच गुरुवारी आणखी चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत पालिकेचे सात अधिकारी निलंबित झाले आहेत.

कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत ‘मनुष्य प्रवेशिकेवर संरक्षक जाळी’ बसवण्याची कार्यवाही सुरू होती. ही कार्यवाही सुरू असताना कंत्राटदराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे सकृत दर्शनी दिसून आले. त्यावेळी रस्त्यावरून असलम इसाक शेख (५५) मोबाइलवर बोलत पायी जात होते. शेख मनुष्य प्रवेशिकेजवळ आले. त्यावेळी मनुष्य प्रवेशिकेजवळ कामासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींनी त्यांना हाक मारून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांचा तोल जाऊन ते मनुष्य प्रवेशिकेमध्ये पडले. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान, जाळी लावण्याचे काम सुरू असताना सुरक्षेची जबाबदारी कंत्राटदार आणि त्याचे कामगार आणि सुपरवायझर यांची असते. मात्र या दुर्घटनेच्या वेळी मनुष्य प्रवेशिकेच्या जवळ बॅरिकेड्स, ट्रायपॉड नव्हते. त्यामुळे कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.

१० लाखांचे अर्थसहाय्य

या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे अर्थयहाय्य करण्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.

जाळी बसवण्याचे काम सुरू असतानाच दुर्घटना

महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत गुरुवारी दुपारी कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मनुष्य प्रवेशिकेवर ‘संरक्षक जाळी’ बसविण्याची कार्यवाही सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचे पालिका प्रशासनाच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

हे अधिकारी निलंबित

या प्रकरणी ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले. तसेच, सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

ही घटना कशामुळे घडली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशी घटना पुन्हा घडू यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ ७), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) हे सदस्य आहेत. सदर चौकशी समितीने सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आठ दिवसात मोहीम

भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनुष्य प्रवेशिकेची कामे करताना चारही बाजूंनी सुरक्षा रोधक उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पुढील आठ दिवसांत महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व मनुष्य प्रवेशिकांची १०० टक्के पाहणी करावी. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. त्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे निर्देश सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सातही परिमंडळाचे उपआयुक्त, २६ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांना देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.