मुंबई : साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिकेतील चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी पश्चिम उपनगर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून आठ दिवसात समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
साकीनाका येथील दुर्घटनेचे जोरदार पडसाद सभागृहात उमटले. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. सभागृहाच्या भावना विचारात घेऊन अध्यक्ष नार्वेकर यांनी हा प्रकार गंभीर आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चालणार नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे कठोर मत व्यक्त केले होते. तसेच सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी सरकारने या विषयी निवेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायंकाळी मिसाळ यांनी सरकारच्या वतीने निवेदन केले.
सरकारने पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मॅनहोलची तपासणी करणे, त्यांच्या झाकणाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही ही दुर्घटना झाली आहे. संबंधित ठेकेदार मॅनहोलवरील झाकण बदलण्याचे काम करत होता. मॅनहोलवरील जाळी बदलत असतानाच मोबाईलवर बोलत आलेले शेख मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यापूर्वी सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या असतानाही पावसाळापूर्वी हे काम झाले नाही, त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
चार अधिकारी निलंबित
या प्रकरणी सकृतदर्शनी जबाबदार असलेल्या एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेरले, सहाय्यक दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले आणि सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
