मुंबई : चेंबूरमधील झाड दुर्घटनेच्या अहवालावरून राजकारण तापलेले असताना या गदारोळात साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल मात्र रखडला आहे. दुर्घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप प्रशासनाने अहवाल जाहीर केलेला नाही.

कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याची कार्यवाही सुरू असताना २ जुलै रोजी असलम इसाक शेख (५५) तिथून जात होते व अचानक ते मॅनहोलमध्ये पडले आणि वाहून गेले. १०० मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये त्यांचा मृतदेह मिळाला. या दुर्घटनेची पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेतली व या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीचा अहवाल सात दिवसांत देण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दुर्घटनेच्या दिवशी दिले होते. चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र दुर्घटनेला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही या घटनेचा चौकशी अहवाल प्रशासनाने जाहीर केलेला नाही.

दरम्यान, साकीनाका दुर्घटनेच्या दोनच दिवस आधी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशी अहवालात सर्व अधिकाऱ्यांना निर्दोष सोडल्यामुळे पालिका प्रशासनावर टीका झाली. महापौर रितू तावडे यांनी हा अहवाल फेटाळला व पुन्हा चौकशीचे निर्देश दिले. त्यामुळे साकीनाका दुर्घटनेच्या अहवालाबाबत प्रशासनाने सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

साकीनाका दुर्घटनेप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते व कंत्राटदाराचा शोध सुरू होता. कंत्राटदार न सापडल्यामुळे चौकशीत अडथळे येत असल्याचीही चर्चा आहे. तसेच हे मॅनहोल कोणी का उघडले, कोणाच्या आदेशाने उघडले याची चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दुर्घटनेनंतर प्रसारमाधम्यांशी बोलताना दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

चार अधिकाऱ्यांचे निलंबन

या प्रकरणी पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले आहे. तसेच, सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

समितीमध्ये कोण ?

ही घटना कशामुळे घडली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशी घटना पुन्हा घडू यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ ७), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) हे सदस्य आहेत.