मुंबई : आखाती देशांमधील युद्धामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली असून सामान्य नागरिकांची गॅस अभावी प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. सीएनजी उपलब्ध नाही आणि पीएनजी जोडणी मिळत नाही, अशा कचाट्यात नागरिक अडकले आहेत. साकीनाका येथे गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो नागरिक पीएनजी जोडणीसाठी पाठपुरावा करत आहेत. शिवप्रभा व शिवप्रेरणा ही गृहसंकुले तब्बल १६ वर्षांपासून पीएनजी जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. गृहसंकुलात चार वर्षांपूर्वी केवळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यातून गॅसपुरवठा करण्यात आलेला नाही. तांत्रिक कारणे पुढे करत कंपनीकडून गॅसपुरवठा करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिकांनी विद्युत शेगड्यांना पसंती दिली आहे. मात्र, त्याचा खर्च परवडत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पीएनजी जोडणी उपलब्ध करून देण्याची सूचना राज्य शासनाकडून गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांना इंधन टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. साकीनाका परिसरातील शिवप्रभा, शिवप्रेरणा, धनलक्ष्मी, अण्णा सागर कॉम्प्लेक्स यासह अन्य काही गृहसंकुलातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून पीएनजी जोडणीपासून वंचित आहेत. साकीनाका परिसरातील शिवप्रभा व शिवप्रेरणा या गृहसंकुलांनी २०१० साली पीएनजी जोडणीसाठी रहिवाशांच्या नावाच्या यादीसह महानगर गॅसकडे अर्ज केला होता.

मात्र, त्यानंतर महानगर गॅस व गृह संकुलात काही वर्षे केवळ पत्रव्यवहारच सुरू राहिला. रहिवाशांना केवळ पीएनजी जोडणीबाबत आश्वासने मिळत राहिली. अखेर २०२२ मध्ये गृह संकुलामध्ये महानगर गॅसने पाईपलाईन टाकली. मात्र, गॅसपुरवठ्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे रहिवाशांना सांगण्यात आले. त्यानंतरही रहिवाशांचा पाठपुरावा सुरू होता. ऑक्टोबर २०२५ गॅसपुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा मुदत वाढविण्यात आली. मुदतवाढीनुसार मे २०२६ मध्ये गॅसपुरवठा सुरू होणार असल्याने नागरिकांनी महानगर गॅसकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मात्र, कंपनीने व्यवहार्यता अभ्यास अहवालानुसार गॅसपुरवठा करणे शक्य नसल्याचे नागरिकांना सांगितले. तसेच, गॅसपुरवठा करायचा नव्हता, तर वाहिनी का टाकली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इमारतीपासून अर्धा किमी अंतरावर पीएनजी पंप आहे. मात्र, तरीही इमारतीला गॅस पुरवठा केला जात आहे, असे रहिवासी मनोज भोर यांनी सांगितले. पीएनजीच्या तुलनेत एलपीजी गॅस सिलिंडर महाग असल्याने अनेक नागरिक पीएनजी जोडणीची मागणी करत आहेत. गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नसल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. इमारतीत बहुतांश रहिवासी जेष्ठ नागरिक असल्याने त्यांना यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय गॅस सिलिंडरसाठी १ हजार, तर पीएनजीसाठी महिन्याला केवळ ७०० रुपये खर्च करावे लागत असल्याने नागरिक पीएनजीकडे वळत आहेत. महानगर गॅसने सर्व परिस्थितीचा विचार करून गॅसपुरवठा करावा, अशी मागणी रहिवासी संजना अंकुशराव यांनी केली.