मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवर गुरुवारी उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुमारे चार तासांच्या शोधमोहिमेनंतर संबंधित व्यक्तीला मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव अस्लम शेख (५५) आहे. फोनवर बोलत चालताना शेख यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी मृत कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अस्लम शेख मंगळवारी सकाळी खैरानी मार्गावरून जात होते. त्यावेळी त्या मार्गावर मॅनहोलला जाळ्या बसविण्याचे काम सुरू होते. मात्र, हे काम सुरू असताना कंत्राटदाराने पुरेशी दक्षता घेतली नव्हती. आसपास रस्ता रोधक नसल्याने अस्लम शेख यांना मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि ते मॅनहोलमध्ये पडले. रस्ता रोधक न लावल्याने ही दुर्घटना घडल्याचे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
दरम्यान, महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. चार तासांच्या शोधमोहिमेनंतर शेख यांना मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी त्यांची ओळख पटली. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी सायंकाळी ५ च्या सुमारास घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. अशातच साकीनाक्यात मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्यामुळे उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, प्रशासनाच्या कारभारावर मुंबईकरांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात महापौर रितू तावडे यांनी पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळीही त्यांच्या डोळ्यादेखत महापालिका अधिकारी उघड्या गटारात पडला. त्यानंतर आता पुन्हा मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याने सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठत आहे.
