मुंबई : साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्ती मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या घटनेवरून जोरदार आरोप – प्रत्यारोप झाले होते. त्यानंतरही मुंबई महानगरपालिकेला जाग आली नाही. आजही साकीनाक्यात मॅनहोल उघडेच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केला आहे. समाज माध्यमांवरील पक्षाच्या अधिकृत पेजवर संबंधित फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
भाजपला मुंबईकरांच्या जगणे सुसह्य करण्यासाठी नाही तर असह्य करण्यासाठी जिंकायची होती. याचे उदाहरण देणारी ही घटना आहे. मुंबईच्या साकीनाक्यात एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर सर्व खापर प्रशासनावर फोडले गेले. आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. पण, या दुर्घटनेतून धडा घेऊन महापालिकेने शहरातील मॅनहोल उघडी राहू नयेत, लोकांचा जीव जाऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज होती. पण, आजही त्याच साकीनाक्यात मॅनहोल उघडी आहेत. सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा मुंबईकरांना पुन्हा प्रत्यय आला, असेही पक्षाच्या समाज माध्यमावरील अधिकृत पेजवर म्हटले आहे.
