३४६ पानांचे आरोपपत्र, ७७ साक्षीदार

मुंबई: साकिनाका येथे झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी  विशेष तपास पथकाने अवघ्या १८ दिवसांत आरोपपत्र  दाखल केले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहन चौहानविरोधात ३४६ पानांचे आरोपपत्र मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. साकिनाका येथे एका ३४ वर्षांच्या महिलेवर मोहन चौहानने १० सप्टेंबरला अत्याचार केला होता. तिला अमानुष मारहाण केली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला पोलिसांनी उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेच उपचारादरम्यान तिचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३७६, ३२३, ५०४, ३४ भा.दं.वि.सह कलम ३(१)(डब्ल्यु), ३(२)(अ) अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अधिनियम १९८९ अन्वये नोंद करण्यात आला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने याप्रकरणी आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यामुळे  गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मोहन चौहानला पोलिसांनी अटक केले.  याप्रकरणी विशेष पोलीस पथकाने तपासामध्ये आरोपीविरुध्द वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व प्रकाराचे पुरावे गोळा केले आहेत. तसेच ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद केले असून नमूद गुन्ह्य़ाचा तपास केवळ १८ दिवसांच्या आत पूर्ण करुन अटक आरोपीविरुध्द एकुण ३४६ पानांचे दोषारोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.