एसटी कर्मचाऱ्यांना मंगळवार, ७ डिसेंबरपासून नवीन वेतनवाढ लागू होत आहे. नव्याने नियुक्ती ते दहा वर्षं कालावधी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये वाढ देण्यात येणार आहे. सध्या जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत १८ हजार ८८८ कर्मचारी कामावर परतले असून ७३ हजारांहून अधिक कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान, सोमवारी २५० पैकी १०५ आगारांतून एसटीची वाहतूक सुरू झाली. तर रविवारी एक हजार ७०३ बस फेऱ्यांमधून एक लाख चार हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. संप अद्यापही मिटलेला नाही. विलीनीकरण करणे शक्य आहे की नाही यासाठी शासनाने त्रिसदस्य समितीही नेमली आहे. समितीचा अहवाल आल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेणार नाही, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यानी स्पष्ट केले होते. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर यावे आणि तोपर्यंत ४१ टक्के नवीन वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते. त्यानुसार मंगळवार ७ डिसेंबरला वेतनवाढ लागू होईल. सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १० वर्षं सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. १० ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपयांची पगारवाढ, तसेच २० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन हजार ५०० रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. याशिवाय २८ टक्के महागाईभत्ताही देण्यात येणार आहे.

कर्मचारी संख्येत वाढ नाहीच

राज्यात सोमवारी ९२ हजार २६६ कर्मचाऱ्यांपैकी १८ हजार ८८८ कर्मचारी कामावर हजर असल्याची नोंद झाली. तर ७३ हजार ३७८ कर्मचारी संपावर आहेत. २६ नोव्हेंबरला ११ हजार ५४९ कर्मचारी कर्तव्यावर परतल्याची नोंद होती. २७ नोव्हेंबरला १८ हजार ९० कर्मचारी उपस्थित असल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ३० नोव्हेंबरला १९ हजार ८६ कर्मचारी हजर होते. १ डिसेंबरला हीच संख्या १८ हजार ६९४ तर २ डिसेंबरला १८ हजार ८८२ होती. सोमवारी हीच संख्या १८ हजार ८८८ पर्यंत नोंदवली गेली. त्यामुळे २७ नोव्हेंबरनंतर त्यात फारशी वाढ झालेली नाही. ३७ हजार २२५ चालकांपैकी एत हजार ८८६ चालक आणि २८ हजार ५५ पैकी एक हजार ७९० वाहक कर्तव्यावर परतले आहेत.

सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारांतून एसटीची वाहतूक सुरू झाल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

९३ गुन्हे दाखल

एसटीची वाहतूक करताना आतापर्यंत ४० हून अधिक बसवर दगडफेक करण्यात आली. तर एसटीच्या आवारात बस अडविणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, आगाराचे प्रवेशद्वार बंद करणे आदी घटनांवरून ९३ गुन्हे दाखल झाले आहेत. लातूर आगारातून बाहेर पडणाऱ्या एसटीला प्रतिबंध करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाई केली आहे.  वाहतुकीला विरोध करणाऱ्या १४ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धारुर येथेही बस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salary increase applicable to st employees abn
First published on: 07-12-2021 at 01:17 IST