scorecardresearch

मुलींचा वस्तूप्रमाणे सौदा करणे दुर्देवी, उच्च न्यायालयाची टिप्पणी : कर्जासाठी एका वर्षांच्या मुलीची विक्री

एकविसाव्या शतकातही मुलींना वस्तू मानून तिचा आर्थिक फायद्यासाठी सौदा करण्याच्या घटना दुर्दैवी असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने बुधवारी केली.

high court desicion girl sale for debt
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : एकविसाव्या शतकातही मुलींना वस्तू मानून तिचा आर्थिक फायद्यासाठी सौदा करण्याच्या घटना दुर्दैवी असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने बुधवारी केली. एक हजार रुपयांच्या बदल्यात एका वर्षांच्या मुलीला खरेदी केल्याचा आरोप असलेल्या महिलेला जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे मत नोंदवले.

अश्विनी बाबर (४५) या महिलेला सातारा पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती. तिची जामिनावर सुटका करण्याचे आदेश देताना न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकल खंडपीठाने हे मत व्यक्त केले. ‘‘या प्रकरणाशी संबंधित खटल्याची सुनावणी नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही. याचिकाकर्तीचा पती आणि या प्रकरणातील सहआरोपी जामिनावर बाहेर आहे. संबंधित मुलगी पुन्हा तिच्या पालकांच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे याचिकाकर्तीला स्वत:ला दोन अल्पवयीन मुले आहेत आणि त्यांच्या कल्याणाचाही विचार करणे आवश्यक आहे’’, असे नमूद करून तिला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचेही न्यायालयाने याचिकाकर्तीला दिलासा देताना नमूद केले.

प्रकरण काय?

याचिकाकर्ती आणि तिच्या पतीने या प्रकरणातील तक्रारदार महिलेकडून एका वर्षांच्या मुलीला विकत घेतले होते. मुलीच्या आईला पैशांची नितांत आवश्यकता होती. तिने आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी कर्जाची रक्कम देण्यापूर्वी मुलगी त्यांच्याकडे सोपवण्याची अट घातली. तक्रारदार महिलेने आपल्या एक वर्षांच्या मुलीला कर्जाच्या बदल्यात आरोपी दाम्पत्याकडे सोपवले. पुढे तक्रारदार महिलेने आरोपीला कर्जाची रक्कम परत केली. परंतु, त्यानंतरही आरोपी दाम्पत्याने तिला मुलगी परत करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक करून मुलीला पीडित महिलेच्या हवाली केले.

न्यायालय म्हणाले. ‘विक्री’ हा शब्द वापरताना खूप वेदना होत आहेत. परंतु, या प्रकरणातील नाण्याच्या दुसऱ्या बाजूने जीवनाचे कठीण वास्तव समोर आणले आहे. मुलीच्या आईला पैशाची नितांत गरज होती आणि दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नसल्याने तिला स्वत:च्याच एक वर्षांच्या मुलीला विकावे लागले, असे न्यायालयाने म्हटले. आरोपींनी सावकारी परवान्याशिवाय आगाऊ पैसे दिल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. आरोपीने मानवतेचा खून केला आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 00:03 IST
ताज्या बातम्या