scorecardresearch

औद्योगिक वापराचे ग्लिसरीनची औषध दुकानांमध्ये विक्री

राज्यातील बहुतांश औषध विक्रेत्यांमार्फत सध्या औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लिसरीनऐवजी औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनची विक्री केली जात आहे.

औद्योगिक वापराचे ग्लिसरीनची औषध दुकानांमध्ये विक्री
(फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

मुंबई : राज्यातील बहुतांश औषध विक्रेत्यांमार्फत सध्या औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लिसरीनऐवजी औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनची विक्री केली जात आहे. अनेक औषध उत्पादक कंपन्याही त्यांच्या उत्पादनात औद्योगिक वापरासाठीचे ग्लिसरीन वापरतात. त्याचे नागरिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनच्या विक्रीमुळे भविष्यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता संघटनेकडून वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागान कारवाईची मागणी केली आहे. औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लिसरीनच्या तुलनेत औद्योगिक वापराचे ग्लिसरीन अत्यंत स्वस्त आहे. त्यामुळे अनेक औषध उत्पादक कंपन्या औद्योगिक वापरासाठी तयार केलेले ग्लिसरीन वापरतात. परिणामी राज्यातील बहुतांश औषध विक्रेत्यांकडून औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनची विक्री होत आहे.

मोजक्याच औषध विक्रेत्यांकडे औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लिसरीनची विक्री होते. औद्योगिक वापरासाठी असलेल्या ग्लिसरीनचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने त्याचे दुष्परिणाम नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनमुळे काही वर्षांपूर्वी मुंबईतील जे जे रुग्णालयात काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र त्यानंतरही औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात अन्न व औषध प्रशासन विभाग कमी पडल्याचे दिसून येत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने अशा औषध विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती ऑल फूड अँड ड्रग लायसन होल्डर्स फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 22:06 IST

संबंधित बातम्या