मुंबई:  प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या क्यूआर कोडची अवैध विक्री केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. मंदिर न्यासाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपासून मंदिर परिसरात क्यूआर कोडची अवैधरीत्या विक्री केली जात असल्याची माहिती दादर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार चौकशी सुरू असताना ३० नोव्हेंबरला एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराला मंदिर परिसरात क्यूआर कोडची विक्री करण्यात आली. याबाबत या पत्रकाराने मंदिर प्रशासनाकडे तक्रार केली होती.  दादर पोलीस ठाण्याने चौकशी करून गुरूवारी सिद्धिविनायक गणपती मंदीर न्यासाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तक्रारीच्या आधारे स्वत:च्या फायद्यासाठी गैरमार्गाने क्युआर कोडचे आरक्षण करून, विक्री करणाऱ्या संशयितांविरोधात गुन्हा दाखल  केला. 

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांची  गर्दी होत असते. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांना दर्शन घेण्याकरिता न्यासातर्फे सिद्धिविनायक अ‍ॅपद्वारे क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आलेली होती. दर्शनासाठी आवश्यक असणारा क्यूआर कोड मिळविण्यासाठी भाविकाला सिद्धिविनायक न्यासाने तयार केलेला अ‍ॅप सर्वप्रथम आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करावे लागते. हा  क्यूआर कोड  अहस्तांतरणीय असून तो विनामूल्य आहे. ७ ऑक्टोबरपासून  या  प्रणालीद्वारे विनामूल्य दर्शन सुरू करण्यात आले होते. या संगणकीय प्रणालीचा गैरफायदा घेऊन आरोपी क्यूआर कोडची अवैध विक्री  करत होते.