मुंबई : सौम्य मेंदू रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाल्याने प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांना फेब्रुवारीमध्ये लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तब्बल एक महिना सलीम खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

सलीम खान यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे फेब्रुवारीमध्ये लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर त्यांच्यावर डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सुरुवातीला श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. जलील पारकर याच्या देखरेखखाली दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या उपचारासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चौहान, कार्डिओलॉजिस्ट डॉ.अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. कीर्ती उपाध्याय आणि डॉ. बिनीत आहलुवालिया यांचा समावेश होता. मात्र त्यांची प्रकृती सुधारल्याने मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात आले.