मुंबई : अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक गुरमीत सिंग सुंदर सिंग जॉली उर्फ शेरा याने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

शेरा याच्यावर एका महिलेला धमकावल्याचा आरोप आहे. प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या २०१७च्या सिझनमध्ये एक स्पर्धकाने आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यामुळे सलमानने या स्पर्धकाला बिग बॅासच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या प्रकरणी सलमानविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार करण्यासाठी या स्पर्धकाला घेऊन शबनम शेख या पोलीस ठाण्यात जात होत्या. त्यावेळी, तक्रार करून सलमानला विनाकारण त्रास देऊ नका, अन्यथा परिणाम फार वाईट होतील, असा धमकी वजा इशारा शेराने दिल्याचा आरोप शेख यांनी खार पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण करून २०१९ मध्ये आरोपपत्रही दाखल केले. तसेच, लवकरच शेरा याच्याविरुद्ध आरोपनिश्चिती प्रक्रिया होणार आहे.

शेराची मागणी काय ?

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करावे, अशी मुख्य मागणी शेरा याने याचिकेद्वारे केली आहे. तसेच, त्याच्याविरोधातील सर्व आरोपांचे खंडन करताना आपण संबंधित महिलेला फोन केल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा शेरा याने याचिकेत केला आहे. फोन रेकॉर्डिंगमध्ये असलेला आवाज आपलाच आहे याचा कोणताही पुरावा जोडलेला नसल्याचे दावा देखील शेरा याने केला आहे. त्यामुळे याचिकेवर निर्णय होईपर्यंत आपल्याविरुद्धच्या आरोपनिश्चितीला आणि सत्र न्यायालयातील सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी शेराने केली आहे.