मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांबाबत अपमानजनक टिप्पणी करण्यास किंवा प्रकाशित करण्यास निर्माते अभिनव कश्यप यांना मंबईतील शहर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरती बंदी घातली.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ हा कोणीही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अपमानास्पद आणि धमकी देणारी भाषा वापरू शकतो, असा होत नसल्याचेही न्यायालयाने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा देताना नमूद केले.
सलमान याने शहर दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात कश्यप आणि इतर दोघांना कोणतीही अपमानजनक टिप्पणी करण्यापासून कायमस्वरूपी मनाई आदेश आणि त्यांच्याकडून नऊ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, प्रतिवादी आणि समाजमाध्यमांना सर्व वादग्रस्त मजकूर त्वरित काढून टाकण्याचे आणि बिनशर्त माफी मागण्याचे आदेश देण्याची मागणीही केली आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या २६ दूरचित्रवाणी मुलाखती आणि पॉडकास्ट मालिकेच्या पार्श्वभूमीवर सलमान याने हा दावा केला होता. न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी या प्रकरणी शुक्रवारी कश्यप आणि इतर दोघांविरुद्ध तात्पुरता एकतर्फी मनाई आदेश दिला.
पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीतील कश्यप यांच्या विधानांचे अवलोकन केल्यानंतर, हा मजकूर सकृद्दर्शनी बदनामीकारक, अपमानजनक आहे. तसेच, ही विधाने सर्वसामान्यांच्या नजरेत सलमान याची प्रतिमा मलीन करतात, असे न्यायालयाने नमूद केले. त्याचप्रमाणे, कोणीही कोणाच्याही कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक विधाने करू शकत नाही आणि कोणीही ती करू नयेत, प्रत्येक व्यक्तीची गोपनीयता जपली पाहिजे आणि प्रतिमा जपली पाहिजे, असे न्यायालयाने अधोरेखित केले.
या मुलाखतींमध्ये कश्यप यांनी सलमान याचे स्वरूप, वय आणि वैयक्तिक जीवन वर्णन करण्यासाठी आक्षेपार्ह भाषा वापरतानाच त्याची तुलना कुख्यात गुन्हेगारांशी केल्याचे दाव्यात नमूद केले आहे.

