मुंबई : पनवेल फार्महाऊस शेजारी राहणाऱ्या केतन कक्कड याने समाजमाध्यमावरून आपल्याबाबत प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती या बदनामी करणाऱ्याच नाहीत, तर आपल्याविरोधात जातीय तेढ, चिथावणी निर्माण करणाऱया आहेत, असा दावा अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कक्कडविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिवाणी न्यायालयाने सलमानला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच कक्कड याने समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात प्रसिद्ध केलेल्या बदनामीकारक चित्रफिती काढून टाकाव्या आणि भविष्यात आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्ये करण्यास मज्जाव करावा असे आदेश देण्याची मागणी सलमानने केली आहे.

न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या एकल खंडपीठासमोर सलमानच्या अपिलावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी दिवाणी न्यायालयाने या प्रकरणी मनाई आदेश देण्यास नकार देऊन चूक केल्याचा दावा सलमानचे वकील रवी कदम यांनी केला. कक्कड याने सलमानबाबत समाजमाध्यमावरून प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती निंदनीय आहेत. त्या केवळ बदनामीकारकच नाहीत, तर प्रेक्षकांना सलमानच्या विरोधात जातीय चिथावणी देणाऱया असल्याचेही कदम यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

चित्रफितीतील संभाषणाची प्रत कदम यांनी यावेळी न्यायालयात वाचून दाखवली. त्यात अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य असलेला सलमान पनवेल फार्महाऊस परिसरातील गणेश मंदिर कसे बळकावण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल कक्कडने केलेल्या भाष्याकडे कदम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. या चित्रफितीद्वारे कक्कड याने सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेबाशी केली आहे. अयोध्येतील मंदिर परत मिळवण्यासाठी ५०० वर्षे लागली, येथे सलमान गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बदनामीकारक वक्तव्यही कक्कडने केल्याचे कदम यांनी न्यायालयाला सांगितले.

सलमान कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य असल्याचे वक्तव्यही कक्कड याने केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. सलमान त्याच्या फार्महाऊसमधून अमलीपदार्थ, अवयव आणि बालकांची तस्करी करत असल्याचा आरोपही कक्कड याने त्याच्या चित्रफितींद्वारे केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी थोडक्यात युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रकरणाची सुनावणी २२ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. दरम्यान, सलमानला आपली जमीन हवी आहे. मात्र आपण ती त्याला देत नसल्याने आपल्यावर मानहानीचा दावा दाखल करून सलमानकडून दबाव टाकला जात आहे, असा आरोप कक्कड याने वकील आभा आणि आदित्य सिंह यांच्यामार्फत केला आहे.

चित्रफिती पाहून सलमानविरोधात मतप्रदर्शन केले जात आहे. या चित्रफिती लाखो दर्शकांनी पाहिल्या आहेत आणि त्या पाहून सलमानविरोधात मतप्रदर्शन केले आहे. त्यामुळे कक्कड याने प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती या स्पष्टपणे दर्शकांना सलमानच्या विरोधात चिथावणी देणाऱया आहेत. तसेच त्या हिंदू विरुद्ध मुस्लिम या हेतुने तयार करण्यात आल्याचेा आरोपही कदम यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan defamation claim high court mumbai print news ysh
First published on: 12-08-2022 at 20:59 IST