बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने बुधवारी (१ मे) पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपी अनुज थापन याने मुंबई पोलिसांच्या कोठडीतच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करणाऱ्या आरोपीला बंदूक पुरवणारा अनुज थापन पोलीस कोठडीत होता. कोठडीतच त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल होतं. मात्र, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थापन याला पोलीस मुख्यालयातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथेच त्याने गळफास घेतला. मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील पोलीस लॉक-अपच्या बाथरूममध्ये सकाळी ११ वाजता ही घटना घडल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना राऊत यांनी गृहमंत्रालयाकडे संशयाचं बोट दाखवलं आहे. राऊत म्हणाले, या प्रकरणात रहस्यच रहस्य आहेत. पोलीस कोठडीत एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू होतोय, याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचं गृहमंत्रालय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. याप्रकरणी तपास करण्याची मागणी करूनही काही होणार नाही. त्यासाठी सरकार बदलणं आवश्यक आहे. सरकार बदललं तर अशा प्रकरणांत तपास होईल. आता हे लोक (गृहमंत्री आणि पोलीस) हे प्रकरण दाबतील.

हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसला तीन आव्हानं; म्हणाले, “युवराजांमध्ये हिंमत असेल तर…”

अनुज थापन हा ट्रकवर मदतनीस (क्लीनर) म्हणून कामाला होता. कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुलं व ४० काडतुसं पुरवण्यात आली होती. ही पिस्तुलं देण्यासाठी चंदर आणि थापन दोघेही १५ मार्चला पनवेलला गेले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. पिस्तुल गुप्ता आणि पाल या दोन आरोपींना देण्यापूर्वी चंदर आणि थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan firing accused anuj thapan suicide sanjay raut claims devendra fadnavis responsible asc
Show comments