तंत्रवेडय़ांना ५० हजार तंत्रप्रेमींचा सलाम!

रविवारी सकाळपासून पवईतील आयआयटी संकुलाच्या बाहेर भलीमोठी रांग लागली होती..

IIT,तंत्रमहोत्सव
यंदाच्या तंत्रमहोत्सवात विदेशी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

रविवारी सकाळपासून पवईतील आयआयटी संकुलाच्या बाहेर भलीमोठी रांग लागली होती.. कुणाला रोबो पाहायचा होता.. तर कुणाला कार्यशाळेत सहभागी व्हायचे होते.. निमित्त होते वार्षिक तंत्रमहोत्सवाचे. चिमुकलेही अगदी उत्साहाने रांगेत उभे होते. तर काही शाळांतील शिक्षकच विद्यार्थ्यांना नवकल्पना दाखविण्यासाठी आयआयटी संकुलात घेऊन येत होत्या. देशातीलच नव्हे तर जगभरातील तंत्रवेडय़ांनी साकारलेल्या विविध कलाकृतींचे येथे प्रदर्शन पाहवयास मिळते. ही आयती संधी सोडायची नाही म्हणून रविवारी तब्बल ५५ हजार तंत्रप्रेमींनी संकुलातील महोत्सवाला भेट दिली.
तंत्रमहोत्सवात सहभागी झालेल्यांपैकी काहींसाठी या ठिकाणी येणे ही धम्माल होती तर काहींसाठी अभ्यास होता. लहानग्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रविवारी आयआयटी संकुल गजबजले होते. येथे बसविण्यात आलेल्या नवमिती आभासी सफरीचे सर्वाना विशेष आकर्षण वाटत होते. यामध्ये एका खुर्चीत बसून डोळ्यावर एक उपकरण ठेवायचे. यातून आपण अगदी आकाशापासून ते पाताळापर्यंतची सफर अवघ्या दोन मिनिटांत करतो. या खुर्चीला देण्यात आलेल्या जॉयस्टिकने आपण आपल्या हालचालींवर नियंत्रण करू शकतो. या आभासी सफरीत आपण खरोखरच त्या ठिकाणी असल्याचा भास होतो. ही यंत्रणा भारतात प्रथमच पाहावयास मिळाल्यामुळे विद्यार्थी येथे गर्दी करत होते.

विदेशी विद्यार्थ्यांनाही भुरळ
यंदाच्या तंत्रमहोत्सवात विदेशी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात नेदरलँड, स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया, इस्र्रायल, रशिया, पोलंड अशा अनेक देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. टेकफेस्टमध्ये आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांनी विविध विषयांवरील प्रयोगांचे सादरीकरण केले. ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची फारच गर्दी झाली होती. भारतीय विद्यार्थी त्यांच्याशी चर्चा करून तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला.

इस्रायलचा आयकेन
दृष्टिहीनांसाठी रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असे यंत्र येथील विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. हे आयकेन यंत्र हाताच्या मुठीत मावेल इतक्या आकाराचे असून यामधील सेन्सरमुळे समोर येणाऱ्या अडथळ्याविषयी अंध व्यक्तीला सतर्कतेच्या सूचना मिळतात. या यंत्राची मर्यादा पाच मीटर इतक्या अंतरापर्यंत आहे. तर आयम्युझिक हे यंत्र अंधांना रंगांची ओळख करून देण्यासाठी उपयोगी ठरते. यामधून स्पर्श केलेल्या वस्तूंच्या विविध रंगांसाठी विशिष्ट आवाजाचे संगीत ऐकू येते. यामुळे दृष्टिहीनांना रंगाची ओळख होते.

मेंदू तपासण्याचे यंत्र
मेंदूच्या तपासणीसाठीच्या पारंपरिक यंत्रापेक्षा वेगळे असणारे जी-टेकचे हे यंत्रही या प्रदर्शानात मांडण्यात आले होते. या यंत्राद्वारे चेतापेशींमधील द्रवाच्या प्रक्रियेचे विश्लेषण करणे सोपे होते. तंत्रमहोत्सवात विविध विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येते. रविवारी डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण ठरले. डॉ. नारळीकरांनी या वेळी आइन्स्टाइनच्या सिद्धांताला धरून विविध वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. तर नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ प्रा. सर्ज हरोचे यांनी प्रकाश व फोटोनबाबतच्या त्यांच्या अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना सांगितले.

भिंतीचे आकर्षण
तंत्रमहोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी एक भिंत रंगविण्यात येते. यंदा ही भिंत ‘जेव्हा भविष्यात ठरविलेले सत्यात उतरले’ या संकल्पनेवर आधारित रंगविण्यात आली आहे. यामध्ये एक चार हात असलेली तरुणी मुख्य गाभा असून तिच्या डाव्या बाजूला वर्तमान दाखविण्यात आले असून उजव्या बाजूला तंत्रज्ञानाने भरलेले भविष्य दाखविण्यात आले आहे. ही भिंत ब्राझिलच्या विद्यार्थ्यांनी रंगवली असून ती महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salute for iit student