आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅनविल एड्रियन डिसूझा उर्फ सॅम डिसूझाचे नाव आले होते. सॅम डिसूझावर पंच प्रभाकर साईलसह नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. परंतु तो अद्यापही मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर किंवा एनसीबी कार्यालयात हजर झालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला होता. त्यामुळे सॅम डिसूझा नेमका कुठे आहे, यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.

सॅम डिसूझा आणि त्याच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने तो लपून बसला आहे, असं काही जण म्हणत आहेत, तर मुंबईत नाही आणि दिवाळीच्या काही दिवसा आधीच त्याने शहर सोडले, अशा देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे सॅम डिसूझाचा शोध घेणं हे एनसीबीसाठी आणि मुंबई पोलिसांच्या एसआयटीसाठीही मोठं आव्हान झालंय. दुसरीकडे सॅम डिसूझाचे वकील यासंदर्भात जास्त खुलासा करण्यास नकार देत असून ते तपास यंत्रणांना सहकार्य करतील आणि योग्य वेळी ते एसआयटीसमोर हजर होतील असे त्यांनी सांगितले आहे.

मुंबईतील रहिवासी, सॅम डिसूझाचे नाव पंच प्रभाकर साईलने आरोप केल्यानंतर समोर आले होते. सॅम आणि केपी गोसावी याने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज केसमध्ये सापडल्यानंतर सोडण्यासाठी पैसे मागितल्याचं साईलने म्हटलं होतं. इंडिया टुडेशी बोलताना सॅमचे वकील पंकज जाधव म्हणाले की, “सॅम लपून बसलेला नाही आणि तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तयार आहे. सॅम डिसूझा यांनी आधीच पोलीस आणि इतर एजन्सींना लेखी तक्रार दिली आहे, की त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. त्यांनी लोकांची नावे देखील दिली आहेत,” असेही त्यांनी सांगितले.