२ ऑक्टोबर रोजी क्रुझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी गोसावी हा फ्रॉड असल्याचे लक्षात येताच शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडून केपी गोसावीने घेतलेले पैसे परत करण्यात मी मदत केली, असा दावा सॅम डिसूझाने केलाय. या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी आणि प्रभाकर साईलने पूजा ददलानीकडून प्रत्येकी ५० लाख रुपये घेतले होते, असा आरोप यापूर्वी सॅम डिसूझाने केला होता. तसेच आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते, त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी त्याने केपी गोसावीला पूजा ददलानीच्या संपर्कात राहण्यास मदत केली, असे सॅमने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.

“प्रभाकर साईल, केपी गोसावी आणि सुनील पाटील या कथित खंडणीत सामील होते. सुरुवातीला पूजा ददलानी आणि केपी गोसावी यांच्यात मीटिंग झाल्याचे मला माहीत होते, पण पैसे घेतल्याचे माहित नव्हते. जेव्हा मला आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा मी गोसावी आणि पाटील यांच्याकडून पैसे परत करण्यात मदत केली. तसेच मी कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्यावर भाष्य करणार नाही. मी मुंबई पोलिसांत माझा जबाब नोंदवेन, असे सॅम डिसोझाने रविवारी सांगितले.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या तपासात सॅम डिसूझाचे नाव समोर आले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि इतरांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या एनसीबीचे पथक आणि मुंबई पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, खंडणीच्या आरोपांवर डिसूझाने स्पष्टीकरण दिलं. “माझा खंडणीच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी फक्त  सुनील पाटील यांना ओळखत होतो, ज्यांनी मला फोन करून क्रूझ पार्टीची माहिती दिली. तसेच पाटील यांनी एनसीबीशी संपर्क साधण्यास सांगितले होते,” असा दावा डिसूझाने केला. डिसोझाने एनसीबी अधिकाऱ्यासोबतच्या कॉल डिटेल्स देखील शेअर केल्या. त्यानंतर पाटील यांनी केपी गोसावी आणि मनीष भानुशाली या आणखी एका व्यक्तीने या प्रकरणी त्यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती दिली.

सॅम डिसूझाच्या जीवाला धोका..

मुंबईतील रहिवासी, सॅम डिसूझाचे नाव पंच प्रभाकर साईलने आरोप केल्यानंतर समोर आले होते. सॅम आणि केपी गोसावी याने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज केसमध्ये सापडल्यानंतर सोडण्यासाठी पैसे मागितल्याचं साईलने म्हटलं होतं. इंडिया टुडेशी बोलताना सॅमचे वकील पंकज जाधव म्हणाले की, “सॅम लपून बसलेला नाही आणि तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तयार आहे. सॅम डिसूझा यांनी आधीच पोलीस आणि इतर एजन्सींना लेखी तक्रार दिली आहे, की त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. त्यांनी लोकांची नावे देखील दिली आहेत,” असेही त्यांनी सांगितले होते.

Aryan Khan Case: सॅम डिसूझा तपासात सहकार्य करण्यास तयार; परंतु त्याच्या जीवाला धोका असल्याची वकिलांची माहिती