शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा अखेर सोमवारी महापौर रितू तावडे यांनी महापालिका सभागृहात केली. पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर आणि राज्य सरकारने अपात्रतेची घोषणा केल्यानंतर राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात आलं होतं. आता या प्रकरणात समाधान सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशाखा राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही नियमांनुसारच झाली आहे. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंना हे सांगितलं होतं की मला कारवाई पासून वाचवा मी २० नगरसेवक फोडून आणते असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे.

समाधान सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्याबाबत काय वक्तव्य केलं?

समाधान सरवणकर म्हणाले, अनेक वर्षांपासून विशाखा राऊत यांना आम्ही ओळखतो. मातोश्रीमधले कार्यकर्तेही ओळखतात. विशाखा राऊत किचन कॅबिनेट मधल्या मेंबर आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांना देखील माहीत होतं की विशाखा राऊत ओबीसी नाहीत. दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज त्यांच्यामुळे अशा परिसरात जे तिकडचे स्थानिक पदाधिकारी इच्छुक होते अशांना डावलून विशाखा राऊतांना तिकीट देण्यात आलं होतं. एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांनी फसवणूक केली. त्यामुळे आज तिकडच्या महिला किंवा तिकडचे जे पदाधिकारी देखील नाराज आहेत. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीही त्यांना मातोश्रीवर बोलवून झापलं आहे.

विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हटल्या होत्या की मला कारवाईपासून वाचवा २० नगरसेवक फोडून आणते-सरवणकर

आज विशाखा राऊत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत आहेत, पण याच विशाखा राऊत यांनी एकनाथ शिंदेंशी दोनवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अपात्रतेच्या कारवाईतून मला वाचवा, मी २० नगरसेवक फोडून पक्षात आणते, पण या सगळ्यातून मला बाहेर काढा, असा प्रस्ताव घेऊन विशाखा राऊत एकनाथ शिंदेंकडे आल्या होत्या, असा गंभीर आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. समाधान सरवणकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. समाधान सरवणकर म्हणाले ज्या वेळी मीना कांबळी यांनी पक्षात प्रवेश केला, त्या वेळेला देखील विशाखा राऊत एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना सिद्धिविनायक मंदिराचं विश्वस्त पद हवं होतं. मात्र एकनाथ शिंदेंनी त्यावेळी यासाठी नकार दिला. त्यामुळे विशाखा राऊत यांच्या मनात एकनाथ शिंदेंबाबत राग आहे. या रागातूनच विशाखा राऊत एकनाथ शिंदेंवर टीका करत असतात असंही समाधान सरवणकर यांनी म्हटलं आहे.